Priyanka Gandhi Vadra : प्रियांका गांधींना पंतप्रधान मोदींवरील टीका भोवणार? निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
Priyanka Gandhi : एका प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ही टीका आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
जयपूर : प्रियांका गांधींना (Priyanka Gandhi) पंतप्रधान मोदींवरील (PM Modi) टीका भोवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधील एका प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ही टीका आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर आयोगाने प्रियांकांना नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाने गुरुवारी (२६ ऑक्टोबर) काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. आयोगाने प्रियंका गांधी यांना 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.
प्रियांका गांधी राजस्थानच्या दौसामधील सभेत बोलताना म्हटल्या की, जेव्हा पंतप्रधान मोदींनी मंदिराला दिलेल्या देणगीचा लिफाफा उघडला तेव्हा त्यात फक्त 21 रुपये आढळले. याबाबत भाजपने प्रियांका गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. भाजपने प्रियांका गांधींच्या भाषणाचा व्हिडिओही त्यात समाविष्ट करण्यात आला होता.
भाजपने काय तक्रार केली?
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले होते की, "आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले होते की, 20 ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाषणादरम्यान विधान करून आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे." प्रियांका गांधी यांनी आचारसंहितेचे पालन केले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुम्ही संहितेच्यावर आहात का? तुम्ही खोटे पसरवू शकत नाही. धार्मिक भावनांचा प्रचारही करता येत नाही, असेही मेघवाल यांनी म्हटले.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी?
प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या, तुम्ही ते पाहिलंच असेल. मी ते टीव्हीवर पाहिले आहे, ते खरे आहे की नाही हे माहित नाही. पीएम मोदी बहुधा देवनारायणजींच्या मंदिरात गेले असावेत. त्यानी दानपेटीत लिफाफा घातला. मी टीव्हीवर पाहिले की, 6 महिन्यांनंतर, जेव्हा मी पंतप्रधान मोदींनी दान केलेला लिफाफा उघडला तेव्हा त्यात 21 रुपये सापडले.
एका प्रकारे हेच होत असल्याचे प्रियांकांनी म्हटले. मंचावर उभे राहून देशात घोषणा देताना अनेक लिफाफे दाखवले जात आहेत. जेव्हा तुम्ही लिलाफे उघडता तेव्हा निवडणूक संपलेली असते.
राजस्थानच्या 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल 3 डिसेंबरला लागेल. सध्या राज्यात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. भाजपकडून राज्यात काँग्रेसला आव्हान दिले जात आहे.