Purvanchal Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं उद्घाटन
Purvanchal Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमधील 340 किमीच्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं उद्घाटन झालं आहे.
Purvanchal Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी करवाल खेरी येथे 340 किमीच्या पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. ते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशमधील जनता पूर्वांचल एक्सप्रेस वेची वाट पाहत होतं. आज त्यांना मोठी भेट मिळाली आहे. हा एक्स्प्रेस वे उत्तर प्रदेशच्या विकासाचा एक्स्प्रेस वे ठरेल. हा एक्स्प्रेस वे उत्तर प्रदेशमधील नागरिकांना समर्पित करत असताना समाधान वाटतेय.’ यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1857 च्या स्वतंत्र्य संग्रामावरही भाष्य केलं.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं शिलान्यास केली, तेव्हा मी विचार केला नव्हता की एक दिवस मी एक्स्प्रेस वे वर विमानानं उतरेल. जगभरात ज्यांना उत्तर प्रदेश आणि येथील लोकांच्या सामर्थ्यांवर विश्वास नाही, त्यांनी सुल्तानपूरमध्ये येऊन उत्तर प्रदेशचं सामर्थ्य पाहू शकतात, असं पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Prime Minister Narendra Modi inaugurates the 341 km long Purvanchal Expressway, in Sultanpur. pic.twitter.com/q1C0rmGMAa
— ANI UP (@ANINewsUP) November 16, 2021
पूर्वांचल द्रुतगती महामार्गाची लांबी 341 किलोमीटर असून तो लखनौ जिल्ह्यात लखनौ-सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.731 वरील चौदसराय गावापासून सुरु होतो आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.31 वर उत्तर प्रदेश-बिहार सीमेच्या पूर्वेला 18 किलोमीटरवर असलेल्या हैदरीया गावापर्यंत जातो. हा द्रुतगती महामार्ग 6 पदरी असून भविष्यात त्याचे 8 पदरीकरण करता येईल. सुमारे 22,500 कोटी अंदाजित खर्च करून निर्माण करण्यात आलेला हा पूर्वांचल द्रुतगती महामार्ग उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्व भागाचा विशेषतः लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगढ, महू आणि गाझीपुर या जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल. द्रुतगती महामार्गावर सुलतानपूरमधील कुरेभर गावाजवळ 3.2 किमी लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे. सुखोई आणि मिराज ही लढाऊ विमाने फ्लायपास्ट करतील. एअर शो दुपारी 2.40 वाजता सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पूर्वांचल द्रुतगती महामार्ग बनवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च -
पूर्वांचल द्रुतगती महामार्ग बनवण्यासाठी सुमारे 22 हजार 495 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा महामार्ग राज्यातील नऊ जिल्ह्यांना (लखनौ, बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर) जोडलेला आहे.