Goa CM Swearing-in Ceremony: 28 मार्चला प्रमोद सावंत घेणार गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित
येत्या 28 मार्चला प्रमोद सावंत हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारणार आहेत.
Goa CM Swearing-in Ceremony : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. पाचपैकी पंजाब वगळता अन्य उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यात भाजपने पुन्हा सत्ता टिकवण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, येत्या 28 मार्चला प्रमोद सावंत हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सर्वांच्या संमतीने प्रमोद सावंत यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्यांदा त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपने विधानसभेच्या 40 पैकी 20 जागा जिंकल्या
गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यामध्ये 20 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच भाजपने गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ( MGP) 2 आमदारांनी आणि तीन अपक्ष आमदारांना पाठिंब्याची पत्रे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना सुपूर्द केली आहेत. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पुढील सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. दरम्यान, पत्र मिळाल्यानंतर राज्यपाल म्हणाले की, डॉ. प्रमोद सावंत यांना 25 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यानुसार मी तुम्हाला गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीसाठी आमंत्रित करतो असे राज्यपालांनी सांगितले आहे.
प्रमोद सावंत यांचा राजकीय प्रवास
डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द कोल्हापुरातून सुरु झाली. जेव्हा ते तिथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सरचिटणीस (GS) पदाची निवडणूक जिंकून आपले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. बारावीपर्यंत गोव्यात शिक्षण घेतल्यानंतर सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी 1991 मध्ये कोल्हापूरच्या रंकाळवेश दुधाळी परिसरात असलेल्या गंगा आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी ते रंकाळा परिसरात भाड्याने राहत होते.
प्रमोद सावंत यांचे नेतृत्वगुण ओळखून त्यांच्या महाविद्यालयातील मित्र परिवाराने त्यांना 1992 मध्ये सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत ते प्रचंड बहुमतांनी जिंकले. यातून खर्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1997 मध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ ही पदवी मिळवली. त्यादरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला. प्रमोद सावंत हे 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या 1997 च्या बॅचने सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे दिवंगत भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या: