PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या 107 व्या भागात देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी रविवारी (26 नोव्हेंबर) झालेल्या कार्यक्रमात त्यांनी 26/11 च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, या दिवशी देशावर सर्वात भयंकर हल्ला झाला होता, असं ते म्हणाले. 


पंतप्रधान मोदींनी 26/11 च्या हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली


पंतप्रधान मोदींनी जनसंवादाच्या सुरुवातीलाच शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी देशात सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडला होता. पण त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता पूर्ण धैर्याने दहशतवादाचा पाडाव केला, ही भारताची ताकद आहे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांना आज देश आठवत आहे."


लोकल फॉर व्होकलला चांगला पाठिंबा - मोदी


पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या 106 व्या भागात 'वोकल फॉर लोकल' मोहिमेवर भर दिला होता. पंतप्रधान म्हणाले होते की, प्रत्येक वेळेप्रमाणेच याही वेळी सणासुदीच्या वेळी 'वोकल फॉर लोकल' हे आपलं प्राधान्य असायला हवं. दिवाळी आणि इतर सणांमध्ये स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. जेणेकरून या कारागिरांना रोजगार मिळू शकेल आणि त्यांच्या पारंपरिक कलेशी संबंधित व्यवसायही भरभराटीला येतील. त्यामुळे या कारागिरांच्या घरातही आनंदाचे वातावरण राहील. मोदींनी दिवाळीत फक्त मेड इन इंडियाच्याच वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं.


त्यानुसार मोदी म्हणाले, "देशात खादी उत्पादनांची विक्री 30 हजार कोटींपेक्षा कमी होती, ती आता 1.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांवर 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. आणि या काळात भारतातील उत्पादने खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. आता तर घरातील मुलेही दुकानात काही खरेदी करताना त्यावर मेड इन इंडिया लिहिलेले आहे की नाही हे तपासू लागले आहेत. इतकेच नाही तर आता लोक ऑनलाईन वस्तू खरेदी करताना मूळ देश तपासण्यास विसरणार नाहीत."


पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या संविधान दिनाच्या शुभेच्छा


'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, "26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारताचं संविधान स्वीकारलं होतं. मी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विकसित भारताचा संकल्प आपण सर्व मिळून नक्कीच पूर्ण करू."


हेही वाचा:


Manoj Jarange On Chhagan Bhujbal : ओबीसी सभेपूर्वी जरांगेंचा पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल; वाचा नेमकं काय म्हणाले?