मुंबई : कोची (kochi) युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे सुरू असलेल्या टेक फेस्टदरम्यान चेंगराचेंगरी (Kochi Stampede) झाल्याची घटना शनिवार 25 नोव्हेंबर रोजी घडली. दरम्यान या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. टेक फेस्टमध्ये गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. अचानक पाऊस सुरु झाल्याने कार्यक्रमादरम्यान एकच धावपळ सुरु झाली.  मृतांमध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान या विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 2000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. 


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कार्यक्रमादरम्यान पाऊस पडला. त्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी अचानक स्टेजसमोरील बाजूकडे धाव घेतली. त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.


ध्वनि भानुशालीचा सुरु होता परफॉर्मन्स


विद्यापीठात तीन दिवसीय टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शनिवार 25 नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस होता.  गायिका निकिता गांधी आणि ध्वनी भानुशाली कार्यक्रम करत असताना ही घटना घडली. 


अनेक स्थानिक लोक झाले होते सहभागी 


एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, केवळ तिकीटधारकांना कार्यक्रमात प्रवेश देण्यात आला होता. तसेच आला होता. तथापि, मैफिलीदरम्यान अनेक स्थानिक रहिवासी देखील सभागृहाबाहेर होते.अचानक पाऊस सुरू होताच सर्व प्रेक्षक स्टेजच्या दिशेने धावले.


मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक 


दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोझिकोड येथील सरकारी अतिथीगृहात तातडीची बैठक घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. विजयन यांनी रविवारी उत्तर जिल्ह्यात सुरू असलेल्या नवा केरळ सदस कार्यक्रमासंदर्भात नियोजित सर्व सांस्कृतिक आणि कला कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली. सर्व जखमींवर उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांची प्रतिक्रिया 


अपघाताबाबत केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, जखमींच्या उपचारासाठी कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे.


दोघे जण गंभीर 


इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एनएसके उन्मेश यांनी सांगितले की, जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील सर्व रुग्णालयांना सतर्क केले असून, मृतांची ओळख पटलेली नाही. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील खुल्या सभागृहात चेंगराचेंगरी झाली. कार्यक्रमाला इतर महाविद्यालयातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.






हेही वाचा : 


'या' योजनेत मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, दिल्लीत 19000 हून अधिक फ्लॅट्स; सविस्तर माहिती एका क्लिकवर