पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन, 'गंदगी मुक्त भारत' मोहिमेची सुरुवात
राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे डिजिटल आणि बाह्य वास्तूंचे संतुलित मिश्रण असून यामध्ये भारताच्या परिवर्तनात्मक बदलाचे दर्शन घडवण्यात आले आहे. 2014 मध्ये 50 कोटीहून अधिक लोक उघड्यावर शौचाला जात होते तेव्हापासून, 2019 मध्ये उघड्यावरील शौचापासून मुक्त होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत राजघाट येथील गांधी स्मृती आणि दर्शन समिती येथे राष्ट्रीय स्वच्छता केंद्र -स्वच्छ भारत मिशनसंबंधी अनुभवांच्या आदानप्रदान केंद्राचे उद्घाटन केले. महात्मा गांधी यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची घोषणा पंतप्रधानांनी 10 एप्रिल 2017 रोजी गांधीजींच्या चंपारण सत्याग्रह शताब्दी समारंभाच्या निमित्ताने केली होती. जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया, यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वच्छता केंद्राबाबत माहिती
राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे डिजिटल आणि बाह्य वास्तूंचे संतुलित मिश्रण असून यामध्ये भारताच्या परिवर्तनात्मक बदलाचे दर्शन घडवण्यात आले आहे. 2014 मध्ये 50 कोटीहून अधिक लोक उघड्यावर शौचाला जात होते तेव्हापासून, 2019 मध्ये उघड्यावरील शौचापासून मुक्त होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या तीन वेगळ्या विभागांचा दौरा केला. त्यांनी प्रथम हॉल 1 मध्ये एक अनोखे 360 अंश कोनातील दृक्श्राव्य सादरीकरण अनुभवले . त्यानंतर ते हॉल 2 मध्ये गेले जिथे स्वच्छ भारत मोहिमेवरील इंटरएक्टिव एलईडी पॅनेल, होलोग्राम बॉक्स, आंतर-संवादी खेळ आणि बरेच काही आहेत. पंतप्रधानांनी आरएसकेला लागून असलेल्या हिरवळीच्या मोकळ्या जागेत सत्याग्रह ते स्वच्छाग्रह या भारत प्रवासातील गाथा दर्शविणारी तीन प्रदर्शने पाहिली, जी स्वच्छ भारत मिशनला अनुसरून होती. ही प्रदर्शने-स्वच्छतेची प्रतिज्ञा घेताना लोकांचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी, ग्रामीण झारखंडची राणी मिस्त्रीस आणि स्वत: ला वानरसेना म्हणवणारी स्वच्छग्राही मुले यावर आधारित आहेत.
शालेय विद्यार्थ्यांशी संवाद
संपूर्ण आरएसकेचा दौरा केल्यानंतर पंतप्रधानांनी आरएसके स्मृती केंद्राला धावती भेट दिली. त्यानंतर त्यांनी आरएसकेच्या अॅम्फिथिएटरमध्ये सामाजिक आणि शारीरिक अंतराचे पालन करत भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दिल्लीतील 36 शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी मुलांनी पंतप्रधानांना घरी आणि शाळेत स्वच्छता उपक्रमाबाबत आलेले अनुभव आणि आरएसकेचा त्यांच्यावरील प्रभाव याबद्दल माहिती दिली. त्यांच्यापैकी एकाने पंतप्रधानांना विचारले की स्वच्छ भारत अभियानाचा त्यांना आवडणारा भाग कोणता आहे, ज्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले की एसबीएमची प्रेरणा असलेले महात्मा गांधी यांना समर्पित भाग त्यांना सर्वात जास्त आवडतो.
राष्ट्राला संबोधन
मुलांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केले. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाचा प्रवास उलगडला आणि राष्ट्रीय स्वच्छता केंद्र महात्मा गांधींना कायमस्वरूपी श्रद्धांजली म्हणून समर्पित केले. त्यांनी स्वच्छतेला लोक चळवळ बनवल्याबद्दल भारतीय जनतेचे कौतुक केले आणि भविष्यातही ही चळवळ अशीच सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात, विशेषत: कोरोना विषाणू विरूद्धच्या लढाईच्या काळात स्वच्छतेच्या महत्वाचा पुनरुच्चार केला.
या प्रसंगी पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने स्वच्छतेसाठी 'गंदगी मुक्त भारत' ही आठवडाभर चालणारी विशेष मोहीम सुरू केली. या दरम्यान 15 ऑगस्ट पर्यंत दररोज शहरी व ग्रामीण भारतात स्वच्छतेसाठी पुन्हा लोक चळवळ सुरु करण्यासाठी विशेष स्वच्छता उपक्रम राबवले जातील.
राष्ट्रीय स्वच्छता केंद्राला भेट
राष्ट्रीय स्वच्छता केंद्र सामाजिक अंतर आणि स्वच्छतेसाठी विहित मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ऑगस्ट पासून सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत जनतेसाठी खुले असेल. या कालावधीत आरएसकेला भेट देणार्या लोकांची संख्या मर्यादित ठेवावी लागेल, त्यामुळे अल्पावधीत विद्यार्थ्यांसाठी कोणतेही दौरे आयोजित केले जाणार नाहीत. मात्र प्रत्यक्ष भेट शक्य होईपर्यंत आरएसकेचा आभासी दौरा आयोजित केला जाईल. अशा प्रकारचा पहिला आभासी दौरा 13 ऑगस्ट रोजी जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्यासमवेत आयोजित केला जाईल. आरएसकेचे तिकिट आरक्षण आणि अधिक माहितीसाठी, rsk.ddws.gov.in वर लॉग इन करता येईल.