PM Modi Dubai Visit : स्थानिक चलनात व्यवहार ते अबुधाबीत IIT कॅम्पस...पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात UAE बरोबर 'हे' करार झाले
PM Modi Dubai Visit : पीएम मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि UAE यांनी आपापल्या चलनात व्यावसायिक व्यवहार सुरू करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
PM Modi Dubai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) ला भेट देऊन शनिवारी (15 जुलै) मायदेशी परतले. फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान शनिवारी एक दिवसीय दौऱ्यासाठी यूएईला पोहोचले. या ठिकाणी पंतप्रधानांनी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली.
पीएम मोदींच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले. भारत आणि UAE यांनी आपापल्या चलनात व्यावसायिक व्यवहार सुरू करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकन डॉलरमध्ये केलेल्या व्यवसायावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत स्थानिक चलनांमध्ये व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.
स्वतःच्या चलनात व्यवहार करणार
या क्रमाने अनेक देशांसोबत रुपयांत व्यवसाय सुरू झाला आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टम (LCSS) स्थापन करण्याचा मानस भारत आणि UAE दरम्यान स्थानिक चलनांमध्ये व्यवसाय करण्यासाठी सामंजस्य करारामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे भारतीय रुपया आणि UAE दिरहाम या दोन्हींचा द्विपक्षीय वापर वाढेल.
UPI ला UAE IPP ला लिंक केलं
याशिवाय, भारताच्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ला UAE च्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म (IPP) शी जोडण्यावरही सहमती झाली. याबरोबरच, दोन्ही देशांचे कार्ड स्विच RuPay आणि UAESwitch ला लिंक करण्यावरही सहमती झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, दोन्ही करार सीमापार व्यवहार आणि अधिक आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देतील.
अबुधाबीत आयआयटी दिल्ली कॅम्पस सुरू होणार
अबुधाबीमध्ये आयआयटी दिल्लीचे कॅम्पस स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले. शिक्षण मंत्रालय आणि अबुधाबीच्या शिक्षण आणि ज्ञान विभाग (ADEK) यांनी आखाती देशात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
COP-28 परिषदेत सहभागी होण्याचे सांगितले
PM मोदींनी UAE मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेचे नियुक्त अध्यक्ष सुलतान अल जाबेर यांचीही भेट घेतली आणि COP-28 च्या अध्यक्षतेदरम्यान भारताच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, UAE मध्ये होणाऱ्या COP-28 ची तयारी UAE च्या राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या परिषदेत सहभागी होण्याचे त्यांनी ठरवले आहे.
पीएम मोदींचं स्वागत
राष्ट्रपती भवन 'कसर अल वतन' येथे पंतप्रधान मोदींचे यूएईच्या राष्ट्राध्यक्षांनी औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पीएम मोदींनी यूएईच्या अध्यक्षांना सांगितले की, आमच्या देशांमधील संबंध ज्या प्रकारे विस्तारले आहेत त्यात तुमचे मोठे योगदान आहे.
महत्त्वाच्या बातम्या :