PM Modi Reviews NMHC: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या लोथल येथे, सुरु असलेल्या “राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या’ बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'प्राचीन काळी भारताचा व्यापार आणि व्यवसाय दूरपर्यंत पसरले होते, आणि भारताचे त्या काळात अस्तित्वात असलेल्या सर्व संस्कृतींशी संबंध होते.' हजारो वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारताच्या या समृद्ध परंपरा खंडीत झाल्या आणि आपण आपल्याच वारशाविषयी, आपल्या क्षमतांविषयी उदासीन झालो, अशी खंत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि सर्वानंद सोनोवाल यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात भाग घेतला.
यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी, राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या या प्रकल्पाच्या जलद विकासाबद्दल आनंद व्यक्त केला. लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात, त्यांनी उल्लेख केलेल्या पंच प्रणाचे त्यांनी स्मरण केले. तसेच आपल्या वारसा स्थळाविषयीचा अभिमान त्यांनी अधोरेखित केला. आणि सांगितले की, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जो समृद्ध वारसा ठेवला आहे, त्यात सागरी वारसा अतिशय महत्वाचा आहे. “आपल्या इतिहासात अशा अनेक कथा आहेत, ज्या आज विस्मरणात गेल्या आहेत. त्यांचे जतन करण्याचे, आणि त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काहीही मार्ग शोधले गेले नाहीत. खरे तर इतिहासातील अनेक गोष्टींपासून आपण बरेच काही शिकू शकतो. भारताचा सागरी वारसा हा देखील एक असाच दुर्लक्षित विषय आहे, ज्याविषयी फारसे बोलले गेले नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
लोथलच्या उत्खननात सापडलेल्या शहरांचे , बंदरांचे आणि बाजारपेठांच्या अवशेषांवरून त्याकाळच्या शहरी नियोजनासंदर्भात आज बरेच काही शिकता येते, असे पंतप्रधानांनी नमूद केले. "लोथल हे केवळ सिंधू संस्कृतीचे एक प्रमुख व्यापारी केंद्र नव्हते तर ते भारताच्या सागरी सामर्थ्याचे आणि समृद्धीचे प्रतीक देखील होते", असे ते म्हणाले. लक्ष्मी आणि देवी सरस्वती या दोघींचीही कृपा या क्षेत्रावर आहे आणि एक काळ होता जेव्हा लोथल बंदर 84 देशांच्या ध्वजांनी चिन्हांकित होते आणि वलभी येथे 80 देशांतील विद्यार्थी राहत होते, असे त्यांनी सांगितले.