पुणे : भारताच्या विरोधात पाकिस्तानचं समर्थन करत त्यांना लष्करी ड्रोन्स पुरवणाऱ्या तुर्कीला (Turkey) आता भारताने धक्का द्यायला सुरुवात केली आहे. आधी भारतीय पर्यटकांनी त्या देशातील बुकिंग रद्द करुन बहिष्कार टाकला. भारतीय व्यापाऱ्यांनीही तुर्कीच्या अनेक वस्तूंवर बहिष्कार टाकला. भारतातील अनेक विमानतळावर सेवा देणाऱ्या सेलेबी या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा भारताने निर्णय घेतला. त्यानंतर आता तुर्कीच्या आणखी एका कंपनीचा नंबर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यासह अनेक शहरांच्या मेट्रोची कंत्राटं मिळालेल्या गुलेरमक कंपनीचेही (Gulermak) कंत्राट रद्द होण्याची

पुणे मेट्रोसह देशातील सूरत, कानपूर आणि भोपाळ या शहरातील मेट्रो बनवण्याची कंत्राटं गुलेरमक (Gulermak)  या तुर्कस्तानमधील कंपनीला देण्यात आली आहेत. भारतातील भागीदार कंपन्यांसोबत गुलेरमक कंपनी या शहरांमध्ये मेट्रो मार्गातील बोगदे तयार करण्याचं काम करत आहे. 

Turkey Gulermak : तुर्कीच्या गुलेरमक कंपनीला वेगळा न्याय?

पाकिस्तानच खुलं समर्थन केल्याबद्दल तुर्कस्तानच्या सेलेबी या कंपनीचं भारतातील एअरपोर्टवर ग्राउंड हँडलिंगची सेवा देण्यासाठीचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. मग भारतात हजारो कोटी रुपयांची कंत्राटं ज्या गुलेरमक कंपनीला देण्यात आली आहेत त्या कंपनीला देखील तोच न्याय लावला जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Gulermak Contracts List In India : गुलेरमकला भारतात कोणती कंत्राटं?  

गुलेरमकचे सीईओ अल्पर उझमान यांना नुकताच तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांच्यातर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. ही कंपनी नक्की कशी आहे आणि भारतात कुठे आणि किती रकमेची कामे करतेय पाहुयात, गुलेरमक कंपनीला कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड अर्थात KPIL या भारतातील भागीदार कंपनीसोबत भोपाळ मेट्रोचे बोगदे तयार करण्यासाठी 769 कोटींचे कंत्राट मिळालं आहे. कंपनी लवकरच काम सुरु करणार आहे . 

गुलेरमक कंपनीला जे कुमार बिटवेल या भागीदार कंपनीसोबत सुरत मेट्रोचे 1073 कोटींचे कंत्राट मिळाले असून कंपनीने काम सुरु केलं आहे. 

गुलेरमक कंपनीला KPIL या भारतातील भागीदार कंपनीसोबत कानपूर मेट्रोचे 762 कोटींचे कंत्राट मिळाले असून काम सुरु आहे. 

गुलेरमक कंपनीने टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भागीदार कंपनी सोबत पुणे मेट्रोचे 2283 कोटींचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. कंपनी पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्यांसाठीची कंत्राटे मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.        

गुलेरमक कंपनी 1958 मध्ये तुर्कस्तानमध्ये स्थापन करण्यात आली. सध्या ही कंपनी तुर्कस्तानसह भारत, दुबई, स्वीडन, पोलंड आणि मॅसेडोनिया या देशांमध्ये मेट्रो आणि इतर प्रकल्पांची कामे करत आहे.

ही बातमी वाचा: