Plane Crash in China : चीनमध्ये सोमवारी 132 प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमान कोसळले. चीनच्या नागरी उड्डाण प्रशासन (CAAC) ने सांगितले की, विमानाने कुनमिंग शहरापासून ग्वांगझूच्या दक्षिणेकडे उड्डाण केले आणि गुआंग्शी प्रदेशात त्याचा रडार संपर्क तुटला. यानंतर हा अपघात झाला. या अपघातानंतर भारतीय हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले की, भारतीय विमान कंपन्यांच्या बोईंग 737 ताफ्यावर अतिरिक्त पाळत ठेवली जात आहे.


DGCA प्रमुख अरुण कुमार म्हणाले की, 'चायना इस्टर्न एअरलाइन्सचे बोईंग 737-800 विमान अपघातानंतर भारताने आपल्या बोईंग 737 विमानांची अतिरिक्त देखरेख आणि पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.' यावेळी ते म्हणाले की, 'उड्डाण सुरक्षा ही गंभीर बाब आहे आणि आम्ही परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत आहोत. सध्या आम्ही आमच्या 737 विमानांवर पाळत ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.'


स्पाईसजेट, विस्तारा आणि एअर इंडियाकडे भारतात त्यांच्या ताफ्यात बोईंग 737 विमाने आहेत. ऑक्टोबर 2018 ते मार्च 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीत, दोन बोईंग 737 MAX विमाने क्रॅश होऊन एकूण 346 लोकांचा मृत्यू झाला. या दोन अपघातांनंतर भारताने मार्च 2019 मध्ये बोईंग 737 MAX विमानांवर भारतात बंदी घातली. DGCA च्या समाधानासाठी बोईंगने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक सुधारणा केल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विमानाच्या व्यावसायिक ऑपरेशनवरील बंदी उठवण्यात आली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha