बीजिंग: चीनमध्ये Boeing 737 या विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या विमानातून एकूण 132 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला आहे आणि किती जणांचे जीव वाचले आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या विमान अपघाताने आपल्याला धक्का बसला असल्याचं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी म्हटलं आहे. त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशदेखील दिले आहेत.
पर्वताला धडक बसल्याने अपघात
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, Boeing 737 हे 132 प्रवासी घेऊन जाणारे विमान कुमिंग शहराकडून ग्वांझगू शहराकडे जात होते. यामध्ये 123 प्रवासी तर 9 क्रू मेंबर्स असल्याची माहिती आहे. गॉन्गशी या भागात आल्यानंतर एका पर्वताला धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणच्या जंगलाला आग लागली असून आगीचे मोठे लोट दिसत आहेत.
कसं होतं हे Boeing 737 विमान?
अपघात झालेलं हे Boeing 737 विमान केवळ साडेसहा वर्षे जुनं होतं. जून 2015 साली याची खरेदी करण्यात आली होती. यामध्ये 162 प्रवासी सीट्स होत्या. त्यापैकी 12 या बिझनेस क्लासच्या तर 150 या इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत. Boeing 737 हे मध्यम आणि लांबच्या प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित आणि आरामदायी विमान मानलं जातं.
2010 साली असाच मोठा अपघात
एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये 2010 साली असाच एक मोठा विमान अपघात झाला होता. त्यामध्ये Embraer E-190 या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 44 लोकांचा मृत्यू झाला होता.
चीनकडून हॉटलाइन नंबर जारी
या विमानात ज्या लोकांचे नातेवाईक प्रवास करत होते त्यांच्यासाठी चीनकडून एक स्पेशल हॉटलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. +864008495530 या नंबरवर कॉल करुन या सर्व माहिती घेता येऊ शकेल.