Israel War : आम्ही कठीण काळात तुमच्यासोबत; पीएम मोदींची इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत चर्चा
PM Modi On Israel War : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
नवी दिल्ली : हमाससोबत सुरू (Hamas attack On Israel) असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी मंगळवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी नेतन्याहू यांना दिले.
पीएम मोदींनी सोशल मीडिया X वर पोस्ट करत लिहिले की, "मला फोन करून परिस्थितीबद्दल माहिती दिल्याबद्दल मी पंतप्रधान नेतन्याहूंचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो.
I thank Prime Minister @netanyahu for his phone call and providing an update on the ongoing situation. People of India stand firmly with Israel in this difficult hour. India strongly and unequivocally condemns terrorism in all its forms and manifestations.
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2023
पंतप्रधान मोदी म्हटले होते दहशतवादी हल्ला
पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासने शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रॉकेट हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर म्हटले की, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने धक्का बसला आहे. मृतांच्या कुटुंबीयांबाबत शोक व्यक्त करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
सध्या इस्रायलमध्ये स्थिती काय?
वृत्तसंस्था एसोसिएटेड प्रेसने (AP) दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले वाढवले आहेत. गाझामधील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात 680 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3700 हून अधिक जखमी झाले आहेत. तर, अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायलमध्ये 900 हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहे.
युद्ध हमासने सुरु केलं, आम्ही संपवणार, इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा
इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel-Palestine Conflict) दहशतवादी संघटना हमास (Hamas) यांच्यी संघर्ष तीन दिवसानंतरही कायम आहे. हमासच्या हल्ल्यात (Israel-Hamas Conflict) इस्रायलच्या 900 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच्या प्रत्युत्तरात इस्रायल लष्कराने गाझापट्टी (Gaza Update) हमासच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 500 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या संघर्षादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला आहे. हे युद्ध आम्ही सुरू केले नाही पण आम्हीच हे युद्ध संपवू, असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे.