Parliament Budget Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये वाढती बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कपात आणि युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणे यासह अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय प्रस्तावांना संसदेची मंजुरी मिळवणे तसेच जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्प सादर करणे हे सरकारच्या अजेंड्याच्या शीर्षस्थानी असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी जम्मू आणि काश्मीरसाठी अर्थसंकल्प सादर करतील. दुपारच्या जेवणानंतरच्या कामकाजादरम्यान सभागृहात त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


अधिवेशनात अनुसूचित जमाती संविधान सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. ते विधेयक पारित करण्याबाबत चर्चा होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 29 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पार पडले. मात्र, यावेळी देशातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत लक्षणीय घट झाल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सकाळी 11 वाजल्यापासून सलग चालणार आहे.


भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर तर पंजाबमध्ये आपने काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. याआधी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला अभिभाषणाने सुरू झाला, त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले.


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha