Russia-Ukraine war :  रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात असणारी अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या नकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजारात विविध कंपन्यांचे सुमारे 77,000 कोटी रुपयांचे आयपीओ पुढे ढकलण्यात आले आहेत. लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, आयपीओच्या बाबतीत अशी परिस्थिती या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कायम राहू शकते, असं तज्ञांनी सांगितले आहे. यामधील महत्त्वाचे कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कोणत्याही किंमतीवर त्यांची महत्त्वकांशा ही पुढे न्यायची आहे.


51 कंपन्यांना आयपीओ साठी मंजुरी - 
प्राइम डेटाबेसमधील भांडवली बाजार संशोधकाच्या मते, बाजार नियामकाकडून मंजूरी मिळाल्यानंतर सुमारे 51 कंपन्या आयपीओद्वारे 77,000 कोटी रुपये उभारण्यास तयार होत्या. यामध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) सह 44 कंपन्यांचा समावेश नाही, ज्यांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडे आयपीओसाठी दस्तऐवज सादर केले आहेत परंतु त्यांना अद्याप मंजुरी मिळणे बाकी आहे.


इक्विटी मार्केटमध्ये अस्थिरता कायम राहणार? -
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर, भारत आणि जागतिक बाजारपेठेत मोठ्या घसरणीमुळे कंपन्यांनी त्यांच्या आयपीओची योजना पुढे ढकलल्या आहेत. युद्धामुळे ऊर्जा क्षेत्रातील किंमतीत उसळी पाहायला मिळते आहे आणि भारताचे चलन गेल्या काही वर्षातल्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. यासोबतच भू-राजकीय तणाव आणि आयातित क्रूडवर भारताचे अवलंबित्वाच्या कारणामुळे इक्विटी मार्केटमध्ये अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


आत्तापर्यंत 2022 मध्ये फक्त तीन आयपीओ लाँच - 
ऐतिहासिकदृष्ट्या, जेव्हा प्राइमरी मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण असते तेव्हाच सेकंडरी मार्केटमध्ये हालचाल दिसून येते. ऑक्टोबरपासून बाजारावर दबाव असला तरी गेल्या दोन महिन्यांत अस्थिरतेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे 2022 मध्ये फक्त तीन IPO लाँच करण्यात आले आहेत अशी प्रतिक्रिया प्राइम डेटाबेसचे एमडी प्रणव हल्दिया यांनी दिली. या वर्षी अदानी विल्मर, वेदांत फॅशन्स आणि AGS ट्रान्झॅक्टचा IPO लॉन्च झाला, ज्यांनी 7 हजार 429 कोटी रुपये उभारले आहेत.


'या' मोठ्या कंपन्यांचे आयपीओ लवकरच - 
2013 मधील परिस्थितीशी त्याची तुलना करायची झाल्यास बाजारातील परिस्थितीमुळे 80 हजार कोटी रुपयांच्या आयपीओला फटका बसला होता, त्यांना एकतर सेबीची मान्यता मिळाली होती किंवा त्यांनी शेअर विक्रीची कागदपत्रे सादर केली होती असंही हल्दिया म्हणाले.


या वर्षी आयपीओच्या प्रतीक्षेत असलेल्या काही मोठ्या कंपन्या गो एअरलाइन्स (इंडिया) लि., API होल्डिंग्स लि. (PharmEasy ची मूळ कंपनी), Delhivery, Emcure Pharmaceuticals Ltd., Gemini Edibles & Fats आणि Penna Cement. या कंपन्यांची सुमारे २५,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.