Pakistan : पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. भारताशी आम्ही शांततेनं राहू इच्छितो, एकत्र बसून मार्ग काढूया असे आवहान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. परंतु, पाकिस्तानच्या आव्हानाला भारताने फारसा प्रतिसाद दिला नाही. एका टीव्ही मुलाखतीत बोलताना शेहबाज शरीफ यांनी शांतता प्रस्ताव मांडलाय.  


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चा आणि शांतता प्रयत्नांबाबत दिलेल्या टीव्ही मुलाखतीत काही गोष्टींबाबत भाष्य केलंय. परंतु, त्यांच्याच सरकारमधून याबाबत विरोधाभास आहेत. शिवाय सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया देखील कमी झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून वाटत नाही. त्यामुळे अशा स्थितीत भारत सध्या शाहबाज यांच्या आव्हानाकडे ‘दुर्लक्ष’ करण्याच्या मनस्थितीत आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत विरोधाभासांसोबतच निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सरकारसोबत कोणतीही नवी आणि कायमस्वरूपी संवाद प्रक्रिया सुरू करणे शक्य होणार नाही. 


पाकिस्तानात निवडणुकांची निश्चित टाइमलाइन पुढील काही महिन्यांसाठी आहे. तसेच मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत मर्यादित काळातील आघाडी सरकारशी चर्चा पुढे नेणे शक्य नाही. याशिवाय जुलै 2023 पर्यंत पाकिस्तानमध्ये सामान्य पद्धतीने नवे सरकार निवडून आले तर काही महिन्यांतच भारतात सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजू लागेल. मे 2024 पर्यंत भारतात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. 


या सर्व मुद्द्यांसोबतच भारताच्या अध्यक्षतेखालील SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण भारताकडून पाकिस्तानला अद्याप पाठवले गेलेले नाही. यावर्षी भारताला SCO शिखर परिषदेचे आयोजन करायचे आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला देखील सदस्य देश म्हणून आमंत्रित केले जाईल. भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या बैठकीत पाकिस्तानच्या बाजूने शेहबाज शरीफ सहभागी होणार की नाही याचा निर्णय पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच होणार आहे.  


काय म्हणाले शहबाज शरिफ?


भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन युद्धे झाली आहेत.  प्रत्येक युद्धानंतर पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान खाली खाली गेला आहे. पाकिस्तानला आता धडा मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत. आपल्याला एक दुसऱ्यांसोबत राहावे लागणार आहे. आता हे दोन्ही देशांवर निर्भर करते. आपण शांततेने राहू आणि प्रगती करूया. भारताशी झालेल्य युद्धानंतर पाकिस्तानला गरिबी आणि बेरोजगारीचा सामना करावा लागला. त्यामुळे आपण एकत्र बसूया आणि मार्ग काढूया, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी म्हटले आहे.  


महत्वाच्या बातम्या 


Pakistan: पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य, भारताशी झालेल्या तीन युद्धानंतर आम्हाला मिळाला धडा