Pakistan Man Cross Border Fence : एका पाकिस्तानी तरुणानं भारतीय तरुणीला भेटण्यासाठी सीमा ओलांडली. भारतीय तरुणीला भेटण्यासाठी चक्क हा पाकिस्तानी तरुण चक्क तारेच्या कुंपणाखालून भारतात आला. श्री गंगानगरचे पोलिस अधिक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, ''शनिवारी रात्री राजस्थानमधील गंगानगर सीमाभागात सैनिकांनी एका पाकिस्तानी तरुणाला तारेचे कुंपण ओलांडून सीमा पार करताना पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर तो पाकिस्तानहून तरुणीला भेटण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.'' तरुणीला भेटसाठी हा 22 वर्षीय पाकिस्तानी तरुण राजस्थानमधील गंगानगर येथील सीमेवरुन पाकिस्तानहून भारतात आला. 


तरुणीसाठी सीमेपलीकडे येणाऱ्या तरुणाचं नाव मोहम्मद आमिर असं सांगितलं आहे. तो पाकिस्तानच्या सीमावर्ती जिल्ह्यातील बहावलपूरच्या हसीलपूर तहसीलमधील रहिवासी आहे. मोहम्मद आमिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या व्यक्तीने प्राथमिक चौकशीदरम्यान सुरक्षा अधिकार्‍यांना सांगितले की, ''तो फेसबुकवर भेटलेल्या मुंबईस्थित महिलेच्या संपर्कात होता. कालांतराने, ते चांगले मित्र बनले, मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.''


पोलीस अधिक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, ''या तरुणाकडे फक्त एक मोबाईल फोन आणि काही चलनी नोटा होत्या. या प्रकरणाची तपशीलवार चौकशी सुरु आहे. सुरक्षा विभागानं अद्याप याबाबत काही पुष्टी केलेली नाही. गुप्तचर अधिकार्‍यांची एक संयुक्त पथक या प्रकरणी चौकशी करेल. त्याने केलेल्या प्रत्येक दाव्याची उलटतपासणी करण्यात येईल.''


मोहम्मद आमिरने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने मुंबईला जाण्यासाठी भारतीय व्हिसासाठी अर्ज केला होता. पण भारतीय अधिकाऱ्यांनी विनंती नाकारली. व्हिसा नाकारल्यानंतर, त्याने तरुणीला भेटण्यासाठी सीमेवरील कुंपण ओलांडण्याचा निर्णय घेतला. अतिदुर्गम सीमावर्ती ठिकाणाहून 1200 किमी दूर मुंबईपर्यंत कसा पोहोचणार याबाबत मोहम्मदला आमिरला खात्री नव्हती. पोलिसांनी विचारले असता, आपण कसेतरी मुंबईत पोहोचलो असतो, असं आमिर म्हणाला. 


आमिर पाकिस्तानच्या बाजूने भारत-पाकिस्तान सीमेवर कसा पोहोचला हे स्पष्ट नाही. तो राहतो ते ठिकाण हसीलपूर तहसील आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ''त्यांनी अद्याप मुंबईतील महिलेशी संपर्क साधलेला नाही. आमिरच्या संयुक्त चौकशीनंतर गरज पडल्यासच हे केले जाईल. आमिर सध्या मुंबईतील महिलेला भेटू शकेल अशी शक्यता नाही.''


''जर तरुणाने सांगितलेली गोष्ट खरी असेल आणि त्यात काहीही संशयास्पद नसेल, तर त्याला परत पाकिस्तानकडे सोपवले जाईल,'' अशी माहिती पोलिस अधिक्षक शर्मा यांनी दिली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :