Omicron Variant in India : कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा देशात शिरकाव झाला आहे. देशात 2 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनचा (Omicron) पहिला रुग्ण आढळला होता. सध्या देशात ओमायक्रॉनचे (Omicron Cases in India) 23 रुग्ण आहेत. म्हणजेच, 5 दिवसांत 10 पटींनी वाढ झाली आहे. केवळ 5 दिवसांतच दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमायक्रॉननं देशातील 5 राज्यांत शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात 10, राजस्थानमध्ये 9, कर्नाटकात 2, दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येक 1-1 रुग्ण आढळून आला आहे.
देशात सर्वात आधी ओमायक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले होते. त्यानंतर ओमायक्रॉन गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानपर्यंत पोहोचला. राजस्थानच्या जयपूरमध्ये 9 रुग्ण आढळले. चिंतेची बाब म्हणजे, राजस्थानमध्ये आढळून आलेले ओमायक्रॉनचे रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. दक्षिण अफ्रीकामधून राज्यस्थानमध्ये आलेल्या कुटुंबाच्या जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात नऊ जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलं. आरोग्य सचिव वैभव गालरिया म्हणाले की, दक्षिण आफ्रिकातून आलेल्या कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कातील ओमायक्रॉन रुग्णांना उपचारासाठी आरयूएचएसमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांमध्ये सध्या सौम्य लक्षणं जाणवत आहेत.
राजस्थानसोबतच ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. येथे आतापर्यंत 10 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. महाराष्ट्रात 4 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनचा शिरकाव झाला होता. सध्या मुंबईत 02, पुण्यात 01, पिंपरी-चिंचवडमध्ये 06 आणि डोंबिवलीत 01 ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे.
पाहा व्हिडीओ : Omicron चा धोका लहान मुलांभोवती? पिंपरीत 3 मुलांना ओमायक्रॉनचा संसर्ग, चिमुकल्यांचं लसीकरण कधी?
मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण
मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. परदेशातून मुंबईत आलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळं महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. दक्षिण आफ्रिकाहून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या अन् अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत , हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पाच अतिजोखमीच्या आणि 315 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहितीही पालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबात सहा रुग्ण
पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं मात्र तरुणांना धोका अधिक; दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचा दावा
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहेत. अशातच ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. हा व्हेरिएंट कोणत्याही प्रमुख सिंड्रोमच्या सौम्य आजाराचं कारण ठरत असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी सांगितलं. याशिवाय या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या म्युटेशनने तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, इजराईल, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी घातली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, या व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, 'या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे. यामध्ये स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसत आहेत. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Omicron Variant : काळजी घ्या, मास्क वापरा! राज्याची चिंता वाढली, ओमायक्रॉनबाधितांची संख्या 10 वर
- कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त! काय आहेत नवीन दर?
- Omicron Variant in Mumbai : ओमायक्रॉनशी दोन हात करण्यासाठी मुंबई कितपत सज्ज?
- Omicron Cases In Mumbai : मुंबईचं टेन्शन वाढलं, ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्हमध्ये, पाहण्यासाठी क्लिक करा