नवी दिल्ली: देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना आता यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. देशात उद्यापासून म्हणजे 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या वेळी लोकांना जर लस मिळाली नाही, त्यांना केंद्रावरून परत जावं लागलं तर केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. देशात ऑक्सिजन आणि लसींची कोणतीही कमतरता नाही या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या वक्तव्यावर आपण अस्वस्थ असल्याचं पी चिदंबरम यांनी म्हटलंय. 


पी चिदंबरम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "1 मे पासून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची परीक्षा असेल. त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा आहे की राज्यांकडे लसींचा आवश्यक प्रमाणात साठा आहे. त्यांचा हा दावा हवेत उडून जाईल." 


ते पुढे म्हणतात की, "देशातले कोणतेही राज्य हे उद्यापासून सुरू होणाऱ्या 18 ते 44 वर्षामधील लोकसंख्येचे लसीकरण सुरू करण्यास तयार नाही. सरकारचे कोविन अॅपही मदत करू शकत नाही. जर लसींच्या अभावे लोक 1 मे पासून लसीकरण केंद्रावरून परत पाठवलं गेलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?" 


 






देशात लसीचा तुटवडा नाही: केंद्रीय आरोग्यमंत्री 
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर माहिती देताना सांगितलं होतं की, "देशात ॲाक्सिजनचा आणि लसींचा पुरेसा साठा आहे. लोकांनी पॅनिक होऊ नये. प्रत्येक रुग्णाला ॲाक्सिजनची गरज नसते. हे फक्त आरोग्यमंत्री म्हणून सांगत नाही तर मी स्वत: एक डॅाक्टर आहे." 


देशातील लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावर बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले होते की, "राज्यांकडे अद्याप एक कोटी लसींचे डोस उपलब्ध आहेत. येत्या दोन-तीन दिवसात आणखी लसी देण्यात येतील."


केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या या वक्तव्यावर पी चिदंबरम यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, "रुग्ण डॅाक्टरांनी सांगितलं म्हणून ॲाक्सिजनसाठी धावाधाव करत आहेत. डॅाक्टर खोटं बोलत आहेत का? टीव्ही आणि पेपरमधील बातम्या खोट्या आहेत का?" 


उद्या पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु नाही झालं तर केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का असं आव्हान चिदंबरम यांनी  दिलंय.


महत्वाच्या बातम्या :