Exit Poll Result 2021 :  पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी घोषित होणार आहेत. त्याआधी आज एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. यामध्ये भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, टीएमसी एका तर लेफ्टची सत्ता एका राज्यात येण्याचा अंदाज आहे. 


पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार टीएमसीला बंगालमध्ये 152 ते 165 जागा मिळणार आहेत तर भाजपला 109 ते 121 जागा मिळतील तर काँग्रेस-लेफ्ट आघाडीच्या खात्यात 14 ते 25 जागा जाणार असल्याचा अंदाज आहे.  


कुणाला किती मतांचा टक्का
मागील 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा वोट शेअर 44.9 टक्के होता तर भाजपचा 10.2 टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला 37.9  टक्के मतं मिळाली होती तर इतरांच्या खात्यात 7 टक्के मतं होती.  बंगालच्या 2021 च्या निवडणुकीत एक्झिट पोलनुसार यावेळी टीएमसीला 42.1 टक्के मतं मिळतील म्हणजे  टीएमसीला 2.6  टक्के मतांचं नुकसान होणार आहे. तर भाजपच्या खात्यात 39.9  टक्के मतांची टक्केवारी येणार असल्याचा अंदाज आहे. भाजपला 30 टक्के मतांचा फायदा होत असल्याचं यात दिसत आहे.  


आसाममध्ये भाजपची सत्ता परत येण्याची चिन्ह
आसाममध्ये मतांच्या टक्केवारीत दुसऱ्या नंबरला असून देखील भाजपची सत्ता परत येण्याची चिन्ह आहेत. आसाममधील 126 विधानसभेच्या जागांपैकी भाजपला 58-71 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर काँग्रेस प्रणित यूपीएला 53-66 जागा तर इतरांच्या खात्यात  0-5 जागा जाण्याची शक्यता आहे.
 
तामिळनाडुमध्ये भाजप-एआयएडीएमके आघाडीला मोठं नुकसान
तामिळनाडुमध्ये भाजप-एआयएडीएमके आघाडीला मोठं नुकसान होताना दिसत आहे. विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी भाजप-एआयएडीएमके  आघाडी 58-70 जागा मिळतील. तर डीएमके-काँग्रेस आघाडीला 160-172 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे तर इतरांच्या खात्यात 0 ते 7 जागा जातील असा अंदाज आहे.  
 
पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीला विजय मिळणार
पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीला विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे. भाजप आणि सहयोगी पक्षाला 19-23 जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 6 ते 10 जागा मिळू शकतात.  30 जागा असलेल्या विधानसभेत इतर पक्षांच्या 1 ते 2 जागा येण्याची शक्यता आहे. 


केरळमध्ये लेफ्टचं सरकार येण्याची शक्यता
केरळमधील निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार इथं लेफ्टचं सरकार येण्याची शक्यता आहे. राज्यातील 140 जागांपैकी 71 ते 77 जागी लेफ्ट तर काँग्रेस प्रणित यूडीएफला 62-68 जागांवर विजय मिळू शकतो. भाजपला 0 ते 2 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.  



[DISCLAIMER: बंगालमध्ये 8 टप्प्यातील मतदान आज संपलं. तर तामिलनाडु, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील मतदान 6 एप्रिलला पूर्ण झालं होतं. एबीपी न्यूजसाठी सी वोटर या संस्थेनं पाच निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये सर्वे केला. या सर्व्हेमध्ये 1 लाख 88 हजार 473 मतदात्यांची मतं जाणून घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पश्चिम बंगालमधील 85 हजार मतांचा समावेश आहे. या एक्झिट पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 टक्के आहे.