Kerala Exit Poll Results: डाव्यांचा गड मानल्या जाणार्‍या केरळ विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी समोर येतील. मात्र त्यापूर्वी आज एबीपीच्या एक्झिट पोलमध्ये केरळमध्ये निकालाचं काय राजकीय चित्र असेल याची माहिती घेऊयात. 6 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत लोकांनी आपलं सरकार निवडलं आहे, ते 2 मे रोजी जाहीर होईल. एक्झिट पोलनुसार सीपीआयच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) पुन्हा सत्तेत येणार आहे. मात्र युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) चांगली टक्कर दिल्याचं पोलमधून समोर येत आहे. मात्र भाजपाला याठिकाणी काही खास फायदा झालेला दिसत नाही.


कोणत्या क्षेत्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?


लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटच्या संभावित जागा 


केरळमधील जागा तीन विभागांच्या आधारावर विभागल्या गेल्या आहेत. त्यात मध्य केरळ, उत्तर केरळ आणि दक्षिण केरळमधील जागांचा समावेश आहे. सत्ताधारी डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ मध्य केरळमध्ये 16 ते 18 आणि उत्तर केरळमध्ये एलडीएफ 34 ते 36 जागा जिंकू शकते. त्याचवेळी दक्षिण केरळमध्ये एलडीएफ 21 ते 23 जागा जिंकू शकेल. अशा प्रकारे, तिन्ही मतदारसंघांत एकूण  71  ते 77 जागा एलडीएफ जिंकू शकेल आणि केरळमध्ये सत्ता स्थापन करु शकेल, असा कल एक्सिट पोलमधून समोर आला आला आहे.


यूडीएफच्या जागांचा अंदाज


मध्य केरळमध्ये कॉंग्रेसप्रणित यूडीएफ (युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट) 23 ते 25 आणि उत्तर केरळमध्ये 24 ते 26 जागा जिंकू शकेल. दक्षिण केरळमध्ये 15 ते 17 जागा जिंकण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे तीनही मतदारसंघांत यूडीएफ 62 ते 68 जागा जिंकू शकेल.


भाजपला (एनडीए)  फायदा झालेला दिसत नाही


मागील निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकणार्‍या भाजपला दक्षिण केरळमधून यावेळी 2 जागा मिळतील आणि राज्यात केवळ दोन जागा भाजप जिंकू शकेल असा अंदाज आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपाला केवळ 1 जागा जास्त मिळणे अपेक्षित आहे.


कोणत्या पक्षाला फायदा आणि किती पराभव


एलडीएफ


2016 च्या तुलनेत सत्ताधारी एलडीएफला मध्य केरळमधील 5, उत्तर केरळमधील 2 आणि दक्षिण केरळमधील 10 जागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे मागील निवडणुकीपेक्षा 17 जागा कमी मिळण्याची शक्यता आहे. 2016 च्या केरळ विधानसभा निवडणुकीत एलडीएफने 91 जागा जिंकल्या होत्या.


यूडीएफ


मुख्य विरोधी पक्ष असलेल्या यूडीएफला मध्य केरळमध्ये 6, उत्तर केरळमध्ये 2 आणि दक्षिण केरळमध्ये 10 जागा अधिकच्या मिळतील, असा अंदाज आहे. असा प्रकारे यूडीएफला 18 जागांवर फायदा होऊ शकतो. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत यूडीएफला 47 जागांवर मिळाला होता.


वोट शेअरचा अंदाज


एलडीएफचं वोट शेअर


मध्य केरळमध्ये एलडीएफला 40.9 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर 2016 मध्ये याठिकाणी एलडीएफचा 41 टक्के मते होता. उत्तर केरळमध्ये एलडीएफला 43.5 टक्के मते मिळाली होती. तर 2016 मध्ये याठिकाणी त्यांना 44.1 टक्के मते मिळाली. दक्षिण केरळमध्ये एलडीएआरला यावेळी 41.9 टक्के मते मिळू शकतात. गेल्या वेळी येथे त्यांना 44.6 टक्के मते मिळाली होते. एकूण मतांच्या बाबतीत 2016 मध्ये एलडीएफला  43.5 टक्के मते मिळाली होती. 


यूडीएफचा मतांचा वाटा


उत्तर केरळमध्ये यूडीएफला 41.7 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये येथे यूडीएफला 39.9 टक्के मते मिळाली होती. उत्तर केरळमध्ये 42.7 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी उत्तर केरळमध्ये यूडीएफला  40.1 टक्के मतं मिळाले होते. दक्षिण केरळमध्ये यूडीएफला 40.6 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर गेल्या वेळी याठिकाणी त्यांना 35.9 टक्के मते मिळाली होती. यावेळी यूडीएफला एकूण 41.4 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी त्यांची मतांची टक्केवारी 38.8 टक्के होती. 



भाजप  मतांचा वाटा


भाजपला मध्य केरळमध्ये 15 टक्के, उत्तर केरळमध्ये 11 टक्के आणि दक्षिण केरळमध्ये 16.4 टक्के मते मिळू शकतात. एकंदरीत या निवडणुकीत भाजपला एकून 13.7 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये भाजपला 14.9 टक्के मते होती. 
 
बहुमत


केरळमध्ये विधानसभेची एकूण संख्या 140 आहे आणि बहुमताचा आकडा 71 आहे. एक्झिट पोलच्या निकालांमधून असं दिसून येत आहे की एलडीएफच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन होऊ शकते.


(DISCLAIMER: बंगालमध्ये 8 टप्प्यातील मतदान आज संपलं. तर तामिलनाडु, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील मतदान 6 एप्रिलला पूर्ण झालं होतं. एबीपी न्यूजसाठी सी वोटर या संस्थेनं पाच निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये सर्वे केला. या सर्व्हेमध्ये 1 लाख 88 हजार 473 मतदात्यांची मतं जाणून घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पश्चिम बंगालमधील 85 हजार मतांचा समावेश आहे. या एक्झिट पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 टक्के आहे.)