नवी दिल्ली : विरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक संसदेच्या उर्वरित अधिवेशनात सहभाग घेणार नाहीत. कृषी विधेयकावरून झालेल्या खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध म्हणून विरोधकांनी ही भूमिका घेतली आहे.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत. खासदारांच्या बहिष्कारानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि अन्य नेते उपस्थित होते. यापूर्वी लोकसभेत शेतकर्यांच्या मुद्यावरून कॉंग्रेसच्या सदस्यांनी व इतर काही विरोधी पक्षांच्या खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुमारे 150 मिनिट स्थगित करण्यात आले होते.
निलंबित खासदारांना चहाची ऑफर देऊन उपसभापती उपोषणाला
अधीर रंजन चौधरी यांनी रब्बी पिकांसाठी सरकारने किमान आधारभूत किंमती (एमएसपी) वाढवण्याच्या घोषणेचा संदर्भ देताना सांगितले की ही वाढ नाममात्र आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात एमएसपी आणि खरेदीच्या मुद्यावर शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. चौधरी यांनी नुकतीच संसदेने मंजूर केलेल्या दोन कृषी विधेयकाचा संदर्भ देताना सांगितले की, एमएसपीला नव्याने मंजुर झालेल्या कृषी विधेयकात समाविष्ट करण्याची मागणी आम्ही करत आहोत.
सदस्यांनी अन्नत्याग केला, आज दिवसभर मीही अन्नत्याग करणार : शरद पवार
शेतकरी तुमच्यावर (केंद्र सरकारवर) विश्वास ठेवत नाहीत, असंही अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं. तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलं की, काँग्रेसने जे मुद्दे उपस्थित केले त्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे.
संबंधित बातम्या :
- राज्यसभेत कृषी विधेयकावर चर्चेवेळी शरद पवार अनुपस्थित, विधेयकावर शिवसेना-राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका
- सरकारकडून शेतकऱ्यांच्या मृत्यूचं फर्मान; कृषि विधेयकावरुन राहुल गांधी यांचा मोदी सरकार वर हल्ला