नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या यूके व्हेरिएंटनंतर आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंट समोर आला आहे. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव म्हणाले की, "फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात SAS-CoV-2 च्या ब्राझील व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा व्हेरिएंट हा यूके व्हेरिएंटपेक्षा वेगळा आहे. तसंच लस किती प्रभावी आहे याचं आकलन करण्यासाठी प्रयोग सुरु आहे." देशात ब्राझीलियन व्हेरिएटंचा एक आणि दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळले आहेत.


दक्षिण आफ्रिकेतून परत आलेल्यांमध्ये दक्षिण आफ्रिकन स्ट्रेन असल्याचं समोर आलं आहे. सर्व प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांची चाचणी केली असून त्यांना क्वॉरन्टीन केलं आहे. याशिवाय ब्राझीलियन व्हेरिएंटशी संबंधत एक रुग्ण आढळला आहे, अशी माहिती इंडियन सेंटर फॉर मेडिकल रिसर्सचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं.


भारतात यूके व्हेरिएंटचे आतापर्यंत 187 रुग्ण आहेत. यूके व्हेरिएंटने बाधित रुग्णांपैकी कोणाचाही मृत्यू झालेला नाही. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना क्वॉरन्टीन केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेट केलं आहे. तसंच त्यांची चाचणीही करण्यात आली आहे. आमच्याकडे उपलब्ध लसीमध्ये कोरोना व्हायरसचा यूके व्हेरिएंट निष्प्रभ करण्याची क्षमता आहे, असं बलराम भार्गव यांनी सांगितलं.


आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं की, आम्ही यूकेमधून परतणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. जे लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत, त्यांची जीनोम चाचणी केली जात आहे. ही एका चांगणी रणनीती आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी याच नियमांचं पालन होऊल, अशी मला आशा आहे.


दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधून भारतात येणारी विमानं आखाती देशांच्या मार्गे जातात. भारतासाठी थेट विमानं नाही. हवाई मंत्रालय ये सगळं पाहत आहे, असंही त्यांनी सांगितलं.


41 देशांमध्ये दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंट
डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, आयसीएमआर-एनआव्ही SAS-CoV-2 च्या दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंट आयसोलेट आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर पुण्यातील आयसीएमआर-एनआव्हीने SAS-CoV-2 च्या ब्राझीलियन व्हेरिएंटला आयसोलेट केलं आहे.


त्यांनी पुढे सांगितलं की, दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंट हा अमेरिकेसह जगभरातील 41 देशांमध्ये पसरला आहे. भारतात दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळले आहेत. हे लोक अंगोलिया (1), टांझानिया (1) आणि दक्षिण आफ्रिकेतून (2) आले होते. तर यूके व्हेरिएंट जगातील 82 देशांमध्ये पसरला आहे. याशिवाय ब्राझीलचा स्ट्रेनचा 15 देशांमध्ये संसर्ग झाला आहे. भारतात या स्ट्रेनचा पहिला रुग्ण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यास समोर आला होता.