MP bus accident:  मध्य प्रदेशमध्ये सिधी जिल्ह्यात रिवा-सिधी बॉर्डरच्या जवळ एक अपघात झाला आहे. 54 प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळल्याने 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात एएनआयनं देखील वृत्त दिलं आहे. या अपघातात काही जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं असून अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं असून अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि मदत करण्याबाबत आदेश दिले आहेत.


या बसमध्ये जवळपास 50 प्रवाशी होते. प्रवाशांनी भरलेली बस ही सिद्धी येथील एका खोल कालव्यात कोसळली. सिद्धी येथून सतनाच्या दिशेने बस जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आलं. या बसमधील 39 प्रवाशांनी तिकीट बुक केलं होतं. त्यानंतर रस्त्यात आणखी काही प्रवाशी बसमध्ये बसले, अशी माहिती आहे.


रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कालव्याचं पाणी बंद केल्यानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर बस दिसून आली. या अपघातात अजून काही जणांचा मृत्यू झालेला असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.





घटनेनं मन व्यथित
या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुख व्यक्त केलं असून अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि मदत करण्याबाबत आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, या दुर्भाग्यपूर्ण घटनेसंदर्भात माहिती घेत मी सतत प्रशासन आणि बचावकार्यात सहभागी लोकांच्या संपर्कात आहे. ही घटना फार दुखद आहे. मन व्यथित झालं आहे. बचावकार्य सुरु असून जिल्हाधिकारी, कमिश्नर, आयजी, एसपी आणि एसडीआरएफ टीम घटनास्थळावर आहे.