नवी दिल्ली : (India-China Border ) भारत आणि चीन या दोन्ही दोशांच्या सीमा मुद्द्यावरुन मागील बऱ्याच काळापासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पण आता मात्र अनेक उच्चस्तरीय बैठका आणि चर्चा सत्रांनंतर हा तणाव काही अंशी निवळताना दिसत आहे. सध्याच्या घडीला लडाखमध्ये असणाऱ्या पूर्व भागातील पँगाँग त्सो या तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनारी भागातून चीनचं सैन्य, त्यांनी तात्पुरते उभारलेले तंबू, बांधकामं सारंकाही हटवण्याचं काम वेग पकडताना दिसत आहे.


पुढीत सात- आठ दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोमवारीच देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात पीएलएचे अनेक बंकर, अस्थायी चौक्या आणि अन्य तत्सम बांधकामाला या भागातून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनीही यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.


Corona Alert | कोविड रुग्णसंख्या वाढती राहिल्यास मुंबईत लॉकडाऊन, महापौरांचे संकेत


मुख्य म्हणजे चीनचं सैन्यबळही इथं कमी करण्यात येत आहे. दरम्यानच्याच काळात इथं दोन्ही देशांच्या फिल्ड कमांडरमध्ये दररोज बैठकाही होत आहेत. परतीच्या प्रक्रियेत गती आणण्यास या बैठका परिणामकारक ठरत असून दोन्ही सैन्यही मागे हटत असल्याचं बोललं जात आहे.
देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबतची माहिती दिल्याचं पाहायला मिळालं होतं.





दरम्यान मागील वर्षी 5 मे रोजी लडाखमधील सीमा भागात भारत आणि चीनमधील सैन्यामधील झटापट झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं होतं. ज्यानंतर LAC अर्थात प्रत्यक्ष सीमा रेषेवर तणावाचं वातावरण कायम राहिलं. त्यातच 15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेली हिंसक झटापट सदर प्रकरणात तणावाची भर टाकून गेली. या घटनेत दोन्ही देशांना मोठं नुकसान झालं होतं. गलवान खोऱ्यातील झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे 40 हून अधिक जवान मृत्युमुखी पडले होते. मात्र चीननं मृत जवानांचा अधिकृत आकडा मात्र समोर येऊ दिला नाही.