Onam 2021 : केरळवासियांसाठी महत्वाचा सण म्हणजे ओनम. हा सण जगभरातील मल्याळम बांधवांकडून धुमधडाक्यात साजरा केला जातो. ओनम म्हणजे केरळच्या नवीन वर्षाची सुरुवात. बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजाच्या आगमनानिमित्त आज त्याच्या स्वागतासाठी ओनमचा सण साजरा करण्यात येतो. 


दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील महत्वाचा दिवस म्हणजे ओनम. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते. या वर्षी हा सण 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.


बळीराजा आपल्या प्रजेच्या भेटीला
बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजा आपल्या न्यायीपणाबद्दल, पराक्रमाबद्दल आणि प्रजेवरील प्रेमाबद्दल प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याच्या आगमनाचा उत्सव हा ओनमच्या स्वरुपात साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि भलीमोठी रांगोळी काढली जाते. ओनमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखतात. पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं. 


बळीराजाला वरदान
विष्णूने वामन अवतार धारण करुन बळीराजाला पाताळात ढकलले. बळीराजाने वचनपूर्तीसाठी आपले प्राणही दिले. बळीराजाच्या या त्यागावर खुश होऊन विष्णूने त्याला वरदान मागण्यास सांगितले. त्यावर बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ओनमच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असं समजलं जातं. 


ओनम हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या काळात पीक कापणीचा हंगाम सुरु असतो. पावसाळा संपत आल्याने निसर्गात सगळीकडे हिरवाईचा बहर असतो. 


संबंधित बातम्या :