Sonia Gandhi Meeting: शुक्रवारी विरोधी पक्षांसोबत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले, त्या म्हणाल्या की, विरोधकांचा संसदेत ऐक्यावर विश्वास आहे, पण एक मोठी राजकीय लढाई त्याबाहेर लढावी लागणार आहे. आपलं लक्ष्य 2024 लोकसभा निवडणुका आहेत आणि त्यासाठी पद्धतशीर नियोजन करावे लागेल. हे एक आव्हान आहे, पण एकत्र आपण ते करू शकतो. कारण याच्यावर दुसरा पर्याय नाही.


विरोधकांनी एकजूट होण्याचं सोनिया गांधींचं आवाहन
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की प्रत्येकाची स्वतःची एक अडचण असते. परंतु, राष्ट्रहिताची मागणी आहे की आपण सर्वांनी याच्यावरती जायला हवं. त्या म्हणाल्या की “मला खात्री आहे की संसदेच्या येत्या अधिवेशनातही विरोधकांची एकता कायम राहील. मोठी राजकीय लढाई संसदेबाहेर लढावी लागेल." यावेळी विरोधी पक्षांची एकजूट ही राष्ट्रीय हिताची मागणी आहे आणि काँग्रेस आपल्या बाजूने कोणतीही कसर सोडणार नाही.


काँग्रेस अध्यक्षा पुढे म्हणाल्या, की "देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक संकल्पावर पुन्हा जोर देण्याची सर्वात योग्य वेळ आहे. आणि काँग्रेसच्या वतीने कोणतीही कमतरता राहणार नाही.


लोकशाही तत्त्वे वाचवण्यासाठी एकत्र या : शरद पवार
बैठकीला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले, की देशातील सध्याची परिस्थिती पाहता आजची बैठक महत्त्वपूर्ण आहे. मागच्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. लोकशाही देश असणाऱ्या भारतामधील हे त्रासदायक दृश्य आहे. सध्या देश महागाई, आर्थिक मंदी, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे, बेकारी, सीमेवरील तणाव, अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या यांना सामोरा जात आहे. सध्याचं सरकार या समस्या सोडवण्यासाठी पुर्णपणे अपयशी ठरलं आहे. जे घटक लोकशाही, धर्मनिरपेक्षता मानतात. जे लोकशाहीची तत्त्वे, देशाची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत ते एकत्र आले आहेत. यासाठी एक कृतीशील कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून वरील सर्व समस्या सोडवता येतील. मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की आम्ही एकत्र येऊन सर्व समस्या सोडवू शकतो. ज्याच्या माध्यमातून देशाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील स्थिती चांगली होईल.






सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आभासी बैठकीदरम्यान काँग्रेससह 19 पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते. यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी, द्रमुक. शिवसेना, जेएमएम, सीपीआय, सीपीएम, नेशनल कॉन्फ्रेंस, आरजेडी, एआययूडीएफ, वीसीके, लोकतांत्रिक जनता दल, जेडीएस, आरएलडी, आएसपी, केरल काँग्रेस मणी, पीडीपी आणि आययूएमएल या पक्ष आणि संघटनांचा समावेश होता.