मुंबई: पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट सध्या नोवाव्हॅक्ससोबत ओमायक्रॉन व्हेरियंटवर लस विकसित करण्यासाठी काम करत असून लवकरच भारतात ओमायक्रॉनवर खास लस तयार होणार असल्याची माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतीय बाजारात येणार असल्याची माहितीही त्यानी दिली. ही लस ओमायक्रॉनच्या BA 5 च्या व्हेरियंटवर अधिक उपयुक्त असणार आहे.
जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या BA व्हेरियंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. अमेरिकेमध्ये यासाठी मॉडर्ना लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. ही लस ओमायक्रॉनसोबतच कोरोनाच्या मूळच्या व्हायरस विरोधातही प्रभावी आहे.
भारतात विकसित होणारी लस ही बूस्टर लसीच्या रुपात घेतल्यास ती प्रभावी ठरेल असं अदर पुनावाला म्हणाले. भारतातील परिस्थीती पाहता ओमायक्रॉन व्हेरियंटविरोधात खास लस तयार करण्याची गरज आहे. हा व्हेरियंट गंभीर स्वरुपाचा असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे असं अदर पुनावाला म्हणाले.
ओमायक्रॉनची लक्षणं काय?
ओमायक्रॉन आजाराची अनेक लक्षणे तिसर्या लाटेत दिसली. ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, भूक न लागणे, स्नायू कमकुवतपणा, कफ आणि थकवा यासारखी लक्षणे जाणवत होती.
ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणे दिसल्यास काय करावे?
ओमायक्रॉन संसर्ग शोधण्याची अचूक पद्धत RT-PCR चाचणी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसतात तेव्हा शक्य तितक्या लवकर स्वतःची तपासणी करा. ज्या लोकांना सर्दीची लक्षणे दिसतात त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन संसर्ग वाढण्यापासून रोखता येईल. याबरोबरच असा सल्लाही देण्यात आला आहे की, जोपर्यंत चाचणीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवावे. असे केल्याने तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्यापासून वाचवू शकता.
जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. जगातील 50 देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. भारतात देखील कोरोना रूग्णांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: