Independence Day 2022: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले होते की, आज देशासमोर भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही दोन मोठी आव्हाने आहेत. याबाबत राहुल गांधींना विचारले असता ते म्हणाले, "मी भाष्य करणार नाही. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा."


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देताना केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, या 75 वर्षांत देशाने अनेक यश संपादन केले. पण आजचे ‘स्वयंमग्न सरकार’ स्वातंत्र्यसैनिकांच्या महान बलिदानाला आणि देशाच्या गौरवशाली कामगिरीला क्षुल्लक ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहे. मात्र राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर भाष्य करणे टाळल्याचे दिसून आले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "बघा, मी या गोष्टींवर भाष्य करणार नाही. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा."


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 76 व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात म्हणाले की, देशासमोर भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही दोन प्रमुख आव्हाने आहेत. जी राजकारणापुरती मर्यादित नाहीत. त्यांनी देशवासीयांना या विकृतींचा तिरस्कार करण्याचे आवाहन केले आणि पुढील 25 वर्षांत विकसित भारत सुनिश्चित करण्यासाठी पंच प्रण घ्या, असं सांगितले.






घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवत पंतप्रधान म्हणाले की, दुर्दैवाने राजकारणाच्या क्षेत्रातील या दुष्टीने भारतातील प्रत्येक संस्थेत घराणेशाही पोसली आहे. भारताच्या राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी कौटुंबिक मानसिकतेपासून मुक्तता आवश्यक असल्याचे मोदींनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी निवडीमध्ये पारदर्शकता आणणे आणि घराणेशाही संपवण्याचा परिणाम असल्याचे वर्णन केले. त्याचाच परिणाम म्हणून जगभरातील क्रीडांगणांमध्ये तिरंगा फडकवला जात असून राष्ट्रगीत गायले जात असल्याचे ते म्हणाले.


दरम्यान, आज काँग्रेस नेत्यांनीही देशाच्या एकात्मतेसाठी काम करण्याची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी सोमवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले.