मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बिष्णू विदू भौमिक (वय 56) असं या आरोपीचं नाव असून त्याचं दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान असल्याची माहिती आहे. त्याच्यावर डीबी मार्ग पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीने अफझल या नावाने रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आठ कॉल करुन मुकेश अंबानी यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. 


आरोपी हा मूळचा त्रिपुराचा असून तो गेली 30 वर्षे मुंबईतील दहीसर या ठिकाणी राहतोय. दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान आहे. रिलायन्स रुग्णालयाच्या लँड लाईन फोनवर आज त्याने धमकीचा फोन केला. सकाळी 10:39 ते दुपारी 12 या कालावधीत सुमारे आठ कॉल करण्यात आले. यामध्ये आरोपीने मुकेश अंबानींना शिवीगाळ केली आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. एका कॉलमध्ये त्याने स्वतःचे नाव अफजल असं सांगितलं. तर एकदा त्याने धीरूभाई अंबानी असं नाव सांगितलं. 


आरोपीला बोरिवली पश्चिमेतून अटक करण्यात आली असून त्याने कॉल करण्यामागे कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीचे लग्न झालेलं असून त्याला दोन मुलं आहेत. त्याची मानसिक स्थिती स्थिर असून त्याला कोणतीच मानसिक समस्या वा आजार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 


आरोपीने या प्रकारचं कृत्य या आधीही केल्याचं पोलीस रेकॉर्डमधून समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


काय आहे घटना? 
आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा एक फोन कॉल आला होता. याची तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. त्याच वेळी अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली. तर एका पथकाने धमकीच्या फोनचा तपास सुरू केला. 


मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली होती. रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला गेला आहे.