पटना: बिहारमध्ये राजकीय भूकंप करत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रीय जनता दलाशी घरोबा करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Cabinet Expansion) सर्वांच्या नजरा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चिच झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय जनता दलाकडे (RJD) 15 मंत्री पद आणि जनता दल यूनाइटेड (JDU)चे 12 मंत्री असणार आहे. या शिवाय कॉंग्रेसच्या दोन, हम पार्टीच्या एक आणि अपक्ष एका आमदरांना संधी देण्याची शक्यता आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांच्या नावावर एकमत झाले आहे. अवध बिहारी चौधरी हे यादव समाजाचे आहे. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले आहेत. तेजस्वी यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव हेही मंत्री होणार आहेत आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र सुधाकर सिंह यांची बिहारच्या मंत्रिमंडळात नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यासोबतच महागठबंधन सरकारमध्ये मंत्रीपदासाठी डॉ.चंद्रशेखर यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. डॉ.चंद्रशेखर हे मधेपुरा येथील यादव समाजाचे आहेत. डॉ. चंद्रशेखर हे यापूर्वी नितीश मंत्रिमंडळात मंत्री होते.
तर सीमांचलमधून तस्लिमुद्दीन यांचा मुलगा शहनवाजचे नाव पुढे आले असून ते असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएममधून राजदमध्ये आले आहेत. याशिवाय कोइरी समाजातून आलेले आलोक मोहताही यांना देखील मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही ते मंत्री राहिले आहेत. समीर महासेठ हे वैश्य समाजातून आलेले असून के मंत्रीही होऊ शकतात तर सरबजीत यांना दलित कोट्यातून मंत्री करण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ घेत महागठबंधन सरकारची सत्ता बिहारमध्ये आणली आहे. नितीश कुमार यांच्या भूमिकेनं बिहारमध्ये भाजपला झटका बसला आहे. भाजपनं जेडीयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या :