मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीला जगन्नाथ मंदिराचे (Jagnnath Mandir) दरवाजे उघडण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. दरम्यान मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांना मंदिर प्रशानासकडून सोमवार 1 जानेवारीपासून ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार 12 व्या शतकातील या मंदिराच्या आवारात गुटखा, पान, प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ मंदिर प्रशासन (SJTA) च्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना सभ्य कपडे घालावे लागतील. हाफ पँट, चड्डी, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
धोतर परिधान करुन करावे लागणार दर्शन
नियम लागू झाल्यानंतर, 2024 च्या पहिल्या दिवशी, मंदिरात देवाची पूजा करण्यासाठी येणारे पुरुष भक्त धोतर परिधान करुन आले होते. तसेच महिलांनी देखील साडी किंवा सलवार कमीज परिधान केल्याचं पाहायला मिळालं. पहिल्याच दिवशी भगवंताच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. पुरीमधील जगन्नाथाचे मंदिर हे विशेष प्रसिद्ध आहे. दरवर्षी अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
पवित्रता राखण्यासाठी लागू केले नियम
जगन्नाथ मंदिर प्रशासनाने (SJTA) यापूर्वी यासंबंधीचा आदेश जारी केला होता. तसेच पोलिसांनी देखील त्यांना या नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी गुटखा आणि पानावर बंदी लागू करण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही आकारण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था
नवीन वर्षाच्या दिवशी, लोक जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी समुद्रकिनारी असलेल्या तीर्थक्षेत्र पुरी येथे मोठ्या संख्येने पोहोचतात. या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. यावेळीही भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन या दोघांनीही खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
पुरी पोलीस समर्थ वर्मा यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "(सोमवारी) दुपारी 12 वाजेपर्यंत 1,80,000 हून अधिक भाविकांनी जगन्नाथ धामचे दर्शन घेतले आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण आली नाही. अपंग भाविकांच्या दर्शनासाठी पोलीस प्रशासनाकडूनही विशेष सोय करण्यात येत आहे.