मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे 6 जानेवारी रोजी दक्षिण मुंबई लोकसभा (South Bombay Constituency) मतदार संघात सभा घेणार आहेत. गिरगांवातील (Girgoan) वभाग क्रमांक 12 च्या वतीने आदित्य ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात येईल. दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत सध्या खासदार आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. पण त्यांना भाजपकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. 


भाजपला आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईत तयारी केली जातेय. याआधी देखील शाखानिहाय बैठका, लोकसभेचा आढावा, विधानसभानिहाय बैठका तसेच इतर कार्यक्रम देखील ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आल्या होत्या. पण आता दक्षिण मुंबईच्या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आलीये. 


23 जागांवर ठाकरे गटाचा दावा


अगदी काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका लागणार जरी असल्या तरीही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन बराच संभ्रम आहे. त्यातच ठाकरे गटाकडून 23 जागांवर दावा करण्यात आलाय. यामध्ये रामटेक, बुलढाणा,  यवतमाळ वाशिम,  हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर,  नाशिक, पालघर,  कल्याण,  ठाणे,  मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण,  मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य,  रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,मावळ, शिर्डी, धाराशिव,कोल्हापूर,हातकणंगले,अकोला या जागांवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलाय. 


उत्तर पश्चिम मतदारसंघाची जागा सोडण्यासही उद्धव ठाकरेंचा नकार


दरम्यान मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी गळ घातली होती. पण ही जागा सोडण्यास देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट नकार दिलाय. सध्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन किर्तीकर हे खासदार आहेत. गजानन किर्तीकरांनी तत्कालीन शिवसेनेतून ही जागा लढवली होती. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंच्या हातून हा मतदारसंघ निसटला. त्यामुळे ही जागा काँग्रेसला देण्यास उद्धव ठाकरेंनी स्पष्ट नकार दिला. 


लोकसभेच्या (Loksabha election 2024) जागावाटपाबाबत सध्या बराच संभ्रम निर्माण आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरु देखील सुरु आहे. दरम्यान नव वर्षात म्हणजेच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा होणार असल्याची माहिती समोर येतेय. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत ही बैठक होणार आहे. जानेवारी 2 किंवा 3 तारखेला ही बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही तारीख ठरलेली नसल्याचं सांगण्यात येतंय.


हेही वाचा : 


सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, अजित पवारांचा टोला तर सोम्या गोम्या कोण? हे 2024 ला कळेल, राऊतांचा पलटवार