नवी दिल्ली: बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएला कौल दिल्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल हे अजून ठरलेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत एनडीएने 125 जागा जिंकल्या आहेत. परंतु नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाच्या विजयी उमेदवारांच्या संख्येत मोठी घट झाली असून त्यांचे केवळ 43 आमदार विजयी झाले आहेत.


पंतप्रधानांनी संभ्रम दूर केला
एनडीएमध्ये सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आपलाच व्हावा अशी मागणी सुरु केली होती. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत भाजपने नितीश कुमारांना दिलेला शब्द आता ते पाळतील का अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. काल बुधवारी झालेल्या दिल्लीतील भाजपच्या विजयी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची शंका दूर केली. त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली सत्ता बनेल हे स्पष्ट केले. परंतु नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देताना महत्वाची आणि जास्तीची खाती भाजप आपल्या पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.


बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याच्या मार्गावर असणारे नितीश कुमार सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. गेल्या सरकारचा कार्यकाल आता समाप्त झाला असल्याने ते आपला राजीनामा राज्यपालांना सोपवतील. आता पुन्हा एकदा नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या दोन दशकात सात वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट होणार आहे. नितीश कुमारांनी सर्वप्रथम 2000 साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी बहुमतासाठी अपेक्षित संख्याबळ त्यांना जमवता आले नसल्याने राजीनामा द्यावा लागला होता.


नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ
नितीश कुमार सर्वप्रथम 3 मार्च 2000 साली आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. दुसऱ्यांदा 24 नोव्हेंबर 2005 साली ते बिहारचे मुख्यमंत्री बनले. 26 नोव्हेंबर 2010 साली त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चौथ्यांदा त्यांनी 22 फेब्रुवारी 2015 साली मुख्यमंत्रीपद मिळवले. 20 नोव्हेंबर 2015 साली पाचव्यांदा पुन्हा एकदा त्यांनी शपथ घेतली. सहाव्या वेळी 27 जुलै 2017 साली ते परत एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.


महत्वाच्या बातम्या: