Bihar Election Result : बिहार विधानसभेच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या चिराग पासवान यांच्या लोजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. या विजयानंतर चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि भाजपचं अभिनंदन केलं आहे. चिराग पासवान म्हणाले की, निकालानंतर  बिहारचा विश्वास पंतप्रधानांवर आहे हे स्पष्ट झालं आहे.  मी भाजप आणि पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. मला आनंद आहे की लोकजनशक्ती पार्टीला मिळालेला प्रतिसादाबद्दल. एकटे लढूनही 25 लाख मतं आणि 6  टक्के व्होट शेअर मिळाला. यामुळे पक्षात उर्जा निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले आहे. 2025 ला आम्ही ताकदीने मैदानात असू, असं चिराग पासवान म्हणाले.


चिराग पासवान म्हणाले की, बऱ्याच जागी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. बहुतेक जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. 2025 चं जे लक्ष्य आहे त्याच्या आम्ही अगदी जवळ पोहोचलो आहे, असं चिराग पासवान म्हणाले.


बिहारमध्ये  NDA ने 125 जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.  तर महागठबंधननं 110 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला 2015 मध्ये 53 जागा मिळाल्या होत्या तर यंदा 74 जागा मिळाल्या आहेत. तब्बल 21 जागा जास्त जिंकून भाजपनं चांगलं यश मिळवलं आहे. चिराग पासवान यांच्या लोजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. त्यांनी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत 143 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते.


2015 च्या तुलनेत बिहारमध्ये भाजपची भरारी, जदयू, काँग्रेसला मोठा फटका, तेजस्वी लहर कायम


या निवडणुकीत जदयूला खूप मोठा फटका बसला आहे, त्याचे कारण चिराग पासवान यांची लोजपा असल्याचं बोललं जात आहे. 2015 साली 71 जागा जिंकलेल्या जदयूला यावेळी फक्त 43 जागांवर विजय मिळवता आला आहे. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असलं तरी पक्षपातळीवर नितीशकुमारांचं मोठं नुकसान झालं आहे.


दुसरीकडे महागठबंधननं 110 जागा जिंकल्या आहेत. यात  तेजस्वी यादव यांच्या राजदनं 75 जागा मिळवल्या आहेत. राजदला 2015 साली 80 जागा मिळाल्या होत्या. पाच जागा यंदा कमी मिळाल्या असल्या तरी तेजस्वी यांचं हे एकट्याच्या बळावर आणलेलं यश मानलं जात आहे. तर गेल्यावेळी 27 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी आठ जागांवर फटका बसला असून 19 जागा मिळाल्या आहेत. राजद आणि काँग्रेसनं 2015च्या जागांचे आकडे गाठले असते तर कदाचित बहुमत त्यांना मिळाले असते.


कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या


एनडीए-125
भाजप-74
जेडीयू-43
विकासशील इंसान पार्टी-04
हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-04


महागठबंधन-110
आरजेडी-75
काँग्रेस-19
भाकपा-माले-12
सीपीएम-02
सीपीआय-02


एएमआयएम - 5
बहुजन समाज पार्टी - एक
लोक जनशक्ति पार्टी - एक
अपक्ष - एक


संबंधित बातम्या


निवडणूक प्रक्रियेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; राजदचा गंभीर आरोप


Bihar Election: जर भाजपने अवलंबला '1995 चा महाराष्ट्र फॉर्म्युला' तर नितीश कुमारांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात


Bihar Results 2020 | बिहारमध्ये एनडीएला बहुमत तर राजद सर्वात मोठा पक्ष


बिहारमध्ये चुरशीच्या निकालानंतर NDA चीच सत्ता, पंतप्रधान म्हणाले, 'हा लोकशाहीचा विजय'