नवी दिल्ली : बिहारला लोकशाहीचं जमीन का म्हटलं जात हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवलं आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही सर्व नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएनच्या कार्यकर्ता आणि बिहारमधील जनतेसोबत विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असं म्हणत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं आहे.
निवडणुकीसाठी मतदान पार पडलं की पूर्वी हिंसाचाराच्या, मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या, मतपेट्या पळवून नेल्याच्या बातम्या यायच्या. मात्र आता शांततेत मतदान झाल्याच्या, मतदान वाढल्याच्या बातम्या येतात. ही अतिशय सकारात्मक बाब असल्याचं मोदी म्हणाले. याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले.
बिहारच्या निवडणुकीनंतर सायलेंट व्होटरची चर्चा सुरू आहे. भाजपकडे एक मोठा वर्ग आहे. हा वर्ग सायलेंट व्होटर आहे. महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर असल्याचं मोदींनी सांगितलं. भाजप सरकारमध्ये महिलांना सन्मान मिळाला, सुरक्षा मिळाली. जनधनच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम गेली. उज्ज्वला योजनेतून मिळणाऱ्या सिलेंडरमुळे त्याच्या स्वयंपाकघरातला धूर दूर झाला आहे.