I.N.D.I.A. Alliance Nitish Kumar : 'इंडिया' आघाडीच्या बैठकीनंतर नितीशकुमार नाराज? जेडीयू अध्यक्षांनी आता स्पष्टच सांगितले
I.N.D.I.A. Alliance : विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यावर नाराज असल्याची चर्चा होती. आता, जेडीयूकडून यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे.
I.N.D.I.A. Alliance : दिल्लीत झालेल्या इंडिया अलायन्सच्या (I.N.D.I.A. Alliance) बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (AAP) यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्तावित केले होते. या बैठकीला उपस्थित असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यावर नाराज असल्याची चर्चा होती. या नाराजीतून नितीश कुमार यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेला हजेरी लावली नाही. त्यामुळे नाराजीच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली. मात्र, जनता दल युनायटेड पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी यावर भाष्य केले आहे.
जेडीयूने कोणत्याही प्रकारच्या नाराजीचा दावा फेटाळून लावला असून नितीश कुमार बैठक संपेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित असल्याचे म्हटले आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, नितीश कुमार हे नाराज नाहीत. बैठकीला ते शेवटपर्यंत उपस्थित होते. मीटिंगनंतर मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊनच बैठकीतून निघालो. नाराजीच्या चर्चा निखालस खोट्या आहेत. पत्रकार परिषदेत एक-दोन जण बसायचे हे ठरले होते. आघाडीत कोणतीही अडचण नसल्याचा दावा ललन सिंह यांनी केला.
इंडिया गठबंधन मजबूत है।
— Rajiv Ranjan (Lalan) Singh (@LalanSingh_1) December 20, 2023
सीट बंटवारे का काम सभी राज्यों में जल्द हो जाएगा।
संयुक्त सभाएं होंगी जिनमें गठबंधन के सभी नेता शामिल होंगे। pic.twitter.com/zpSInQC4n6
जागावाटपाबाबत जेडीयूने काय म्हटले?
दुसरीकडे जागावाटपाबाबत विचारले असता ललन सिंह म्हणाले की, जागावाटपावर चर्चा झाली आहे. येत्या 15 ते 20 दिवसांत सर्व राज्यांमध्ये जागावाटप केले जाईल. ठिकठिकाणी संयुक्त मोर्चे निघणार आहेत. तेथे सर्वसाधारण बैठका होतील आणि आघाडीतील घटक पक्षांचे नेते त्यात सहभागी होतील.'' नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयू खासदारांच्या बैठकीबाबत लालन सिंह म्हणाले की, ते दिल्लीत असताना खासदारांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. नितीशकुमार यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला होता.
समन्वयकाबाबत निर्णय नाही, पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण?
आघाडीच्या बैठकीतून आघाडी समन्वयकपदाची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती मात्र याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. तर सभेच्या आयोजनाबाबतचे काम समन्वय समिती पाहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत नितीशकुमार समन्वयक बनण्याची शक्यताही धूसर होत आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याने नितीश कुमारही या शर्यतीतून बाहेर पडले असल्याचे म्हटले जात आहे.