नवी दिल्ली : दिल्लीतील न्यायालयाने निर्भया गँगरेप आणि हत्येच्या प्रकरणामध्ये चार दोषिंपैकी एक विनय कुमार शर्माची याचिका खारिज केली आहे. या याचिकेमध्ये त्याने दावा केला होता की, विनय कुमार मानसिकरित्या आजारी असून त्याला उपचाराची गरज आहे.' अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दोषी विनय कुमार शर्मा यांनी ही याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने सांगितलं की, 'मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर चिंता आणि डिप्रेशन सामान्य आहे. तसेच दोषीला योग्य उपचार आणि मानसोपचारतज्ज्ञांची मदत देण्यात आली आहे.'


विनय शर्माच्या अर्जावरील पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. अलीकडेच विनय आपल्या आईसोबत दोनवेळा फोनवर बोलला. तरीही तो लोकांची ओळख विसरू लागला आहे, असा दावा त्याचे वकील कसा करू शकतात, असा सवाल तिहार प्रशासनाने उपस्थित केला होता. विनयने भिंतीवर डोके आपटल्यामुळे झालेली दुखापत वगळता त्याला कुठलाही त्रास नाही, असेही तिहार प्रशासनाकडून न्यायालयाला सांगण्यात आले. एवढचं नाहीतर कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले.


तिहार प्रशासनाने विनयचे सर्व वैद्यकीय अहवाल सादर केले. त्याला जुना कुठलाही आजार नसल्याचेही सांगण्यात आले. 'विनय मानसिक आजारी असेल तर त्याने आपल्या वकिलांशी फोनवर बोलून सगळी माहिती कशी दिली असती,' असा सवालही तिहार प्रशासनाने उपस्थित केला.


न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर 2012 दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेची आई आशादेवी यांनी सांगितले की, 'त्याला उपचारांची अजिबात गरज नव्हती. हा फक्त केसला उशीर करण्याचा प्रयत्न होता. 7 वर्षांनी आज या लोकांना कोर्टाट आपली पत्नी, बहिण, आई यांची आठवण आली. ती मुलगीही कोणाची तरी बहिण-मुलगी होती, मीदेखील कोणाचीतरी मुलगी आणि पत्नी आहे. 7 वर्षांपासून कोर्टाचे धक्के खात आहे.' दरम्यान, निर्भया प्रकरणातील दोषींना तीन मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी होऊ शकते. न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी नवी डेथ वॉरंट जारी केलं आहे.


काय होती घटना :


दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, तिला आणि त्याच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिलं. नंतर पोलिसांनी निर्भयाला रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला सिंगापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. 29 डिसेंबर 2012 रोजी, सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना निर्भयाचा मृत्यू झाला. एक सप्टेंबर 2013 रोजी कनिष्ठ कोर्टाने चार दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश आणि अक्षय सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.


संबंधित बातम्या : 


निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची फाशी निश्चित; सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली


निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला पटियाला हाऊस कोर्टाची स्थगिती, उद्याची फाशी टळली


निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ करावं : इंदिरा जयसिंह