New Delhi Railway Station Stampede : काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 18 जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. यानंतर रेल्वेकडून झालेल्या गैरव्यवस्थापनाबाबत सर्वांनी प्रश्न उपस्थित केले होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी देखील रेल्वेचं अपयश असल्याची टीका केली होती. दरम्यान, या रेल्वे स्थानकावरील या चेंगराचेंगरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ X प्लॅटफॉर्मने डिलीट करावेत, अशा आशयाचे पत्र रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. 


रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला पत्र लिहिले आहे. या पत्रात, रेल्वे मंत्रालयाने X ला 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीशी संबंधित सर्व व्हिडिओ आणि फोटो आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने यामागे नैतिक निकषांचा उल्लेख केला आहे. पत्रात नैतिक नियम आणि आयटी धोरणाचा दाखला देत रेल्वेने X ला असे व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये मृतदेह आणि बेशुद्ध प्रवासी दिसत आहेत. मंत्रालयाने X ला असे सुमारे 250 व्हिडिओ 36 तासांच्या आत काढून टाकण्यास सांगितले आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाच्या पत्रावर X ने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.


नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर 15 फेब्रुवारी रोजी चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी महाकुंभला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर विशेष गाड्यांना उशीर झाल्याने आणि फलाट बदलण्याच्या घोषणेमुळे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले होते.


चेंगराचेंगरीचे कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये उत्तर रेल्वेचे PCCM नरसिंग देव आणि PCSC उत्तर रेल्वेचे पंकज गंगवार यांचा समावेश आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या व्हिडिओ फुटेजसह सर्व उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.


रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 मधील पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाली. पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 14 वर उभी होती, तर जम्मूच्या दिशेने जाणारी उत्तर संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म 15 वर उभी होती. फूट ओव्हर ब्रिजवरून प्लॅटफॉर्मच्या दिशेने प्रवासी जात असताना घसरून पायऱ्यांवर पडल्याची घटना घडली. त्यामुळे इतर प्रवासीही जखमी झाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना