New India Co-op Bank : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-op Bank) रिझर्व्ह बँकेनं (RBI) मोठी कारवाई केली होती. बँकेचं संचालक मंडळ बलखास्त केलं होतं. त्यानंतर या बँकेट ठेवी ठेवेले गुंतवणूकदार चिंतेत होतो. मात्र, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात या बँकेवर निर्बंध लादले होते आणि ठेवीदारांना पैसे काढण्यापासून बंदी घातली होती. मात्र, आता या निर्णयात काही शिथिलता देण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे. यामुळं ग्राहकांना आपत्कालिन स्थितीत पैसे मिळतील.
ग्राहकांना दिलासा मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) संकटग्रस्त न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना वैयक्तिक आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष पैसे काढण्याची सुविधा देण्याच्या योजनेवर काम करत आहे. बँकेच्या प्रशासकाच्या सहकार्याने आरबीआय, ठेवीदारांकडून आणीबाणीचा पुरावा घेतल्यानंतर पैसे काढण्याची परवानगी देण्यावर विचार करत आहे.
काय सांगतो रिझर्व्ह बँकेचा नियम?
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार एखादी बँक बुडाली किंवा दिवाळखोरीत निघाली तर ग्राहकांना जमा केलेल्या रकमेवर पाच लाख रुपयांपर्यंत विम्याचा फायदा मिळतो. अशा परिस्थितीत, नियमांनुसार आरबीआय न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना या मर्यादेपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. म्हणजे बँकेत आपल्या कष्टाची जमा केलेल्या ग्राहकांना पाच लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची सुविधा दिली जाऊ शकते. आरबीआयच्या नियमांनुसार, बँक बुडाल्यानंतर 90 दिवसांच्या आत ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते.
बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याने बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याचे समोर
या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याने बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याल अटक करण्यात आली आहे. हितेश हा बँकेचा अकाउंट हेड होता, त्याच्याकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. तसेच जीएसटी आणि टीडीएसबाबत आणि पूर्ण अकाउंट सांभाळण्याची जबाबदारीही त्याला देण्यात आली होती. त्याने प्रभादेवी शाखेतून 112 करोड तर गोरेगाव शाखेतून 10 करोड रुपये गायब केल्याची माहिती मिळते आहे. याबाबत बँकेच्यावतीने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेहता बरोबर आणखी ही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मंगेश शिंदे यांनी दिली.