बनावट दारुमुळे सहा वर्षांत सात हजार जणांचा मृत्यू, NCRB ची धक्कादायक आकडेवारी
Bihar Hooch Tragedy: बनावट आणि विषारी दारु पिल्यामुळे भारतामध्ये मागील सहा वर्षात जवळपास सात हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
Bihar Hooch Tragedy: बनावट आणि विषारी दारु पिल्यामुळे भारतामध्ये मागील सहा वर्षात जवळपास सात हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मृताची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि पंजाबमध्ये आहे. राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्यूरो (NCRB) च्या आकडेवारीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, बिषारी दारुमुळे बिहारम्ये मागील दोन ते तीन दिवसांत चाळीसपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे 2016 पासून बिहारमध्ये दारुबंदी सुरु आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, बनावट दारु पिल्यामुळे 2016 मध्ये 1,054 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2017 मध्ये 1,510, वर्ष 2018 मध्ये 1,365, वर्ष 2019 मध्ये 1,296 आणि वर्ष 2020 मध्ये 947 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2021 मध्ये देशभरात बनावट दारु पिल्यामुळे 782 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये बनावट दारुमुळे सर्वाधिक 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंजाबमध्ये 127 आणि मध्य प्रदेशमध्ये 108 जणांचा मृत्यू झाला आहे.
सरासरी दररोज चार जणांचा बनावट दारुमुळे मृत्यू -
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2016 ते 2021 पर्यंत सहा वर्षांच्या कालावधीत बनावट अथवा विषारी दारुमुळे भारतात तब्बल 6,954 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच सरासरी देशात दररोज तीन ते चार जणांचा बनावट दारुमुळे मृत्यू झाला आहे.
आकडेवारीनुसार, 2016 ते 2021 या दरम्यान बनावट दारुमुळे मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहा वर्षात मध्य प्रदेशमध्ये बनावट दारुमुळे 1,322 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमध्ये 1,013 आणि पंजाबमध्ये 852 जणांचा मृत्यू झाला आहे.
BSP खासदारानं संसदेत विचारला होता प्रश्न -
बनावट दारुमुळे होणाऱ्या मृत्यूवरुन बहुजन समाज पार्टीच्या खासदाराने लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. 19 जुलै 2022 रोजी बहुजन समाज पार्टी (BSP) चे खासदार कुंवर दानिश अली यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी उत्तर दिलं होतं. त्यांनी वर्ष 2016 पासून 2020 पर्यंतचे एनसीआरबीचे आकडे संसदेत सांगितले होते.
बनावट दारुमुळे कोणत्या राज्यात किती मृत्यू ?
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बनावट दारुमुळे उत्तर प्रदेशमध्ये 425, राजस्थानमध्ये 330, झारखंडमध्ये 487, हिमाचल प्रदेशमध्ये 234, हरियाणामध्ये 489, गुजरातमध्ये 54, छत्तीसगढमध्ये 535, बिहारमध्ये 23, आंध्र प्रदेशमध्ये 293 आणि पश्चिम बंगालमध्ये 24 जणांचा मृत्यू झालाय. नवी दिल्लीमध्ये 116 जणांचा मृत्यू झालाय.