नवी दिल्ली: सरकार कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाबाबत आग्रही दिसतंय, मात्र प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे. देशभरात 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप अशी कुठलीही सुविधा नसल्याचं समोर आलंय. तर 28 टक्के विद्यार्थी आणि पालकांसमोर वीजेची समस्या प्रामुख्याने अडचण असल्याचं समोर आलंय. हा सर्वे केलाय राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात NCERT ने.


एनसीईआरटीच्या या सर्व्हेक्षणात केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सीबीएसईशी संबंधित शाळांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तसेच प्राचार्यांसह एकूण 34000 लोकांनी सहभाग घेतला.यांचं म्हणणं आहे की, प्रभावी शैक्षणिक उद्देश्य प्राप्तीसाठी उपकरणांचा वापर करण्याच्या माहितीचा अभाव तसेच शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतीची पूर्ण माहिती नसल्याचे शिकवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होताहेत.

विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चांगला संवाद होत नाही

एनसीईआरटीच्या सर्व्हेक्षणानुसार, "जवळपास 27 टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नसल्याचं सांगितलं आहे. कोरोना काळात शिक्षणासाठी बहुतांश विद्यार्थी हे मोबाईल फोनचा वापर करत आहेत, मात्र ज्यांच्याकडे दोन्हीपैकी काहीच नाही, अशा विद्यार्थ्यांचं काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

या सर्वेनुसार जवळपास 36 टक्के विद्यार्थी पाठ्यपुस्तक आणि त्यांच्या जवळ असलेल्या पुस्तकांचा वापर करुन अभ्यास करत आहेत. शिक्षक आणि प्राचार्यांकडे लॅपटॉप हे माध्यम दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा वापर ते शिक्षणासाठी करत आहेत. महामारीच्या या काळात टीव्ही आणि रेडिओ सर्वात कमी वापरली जाणारी उपकरणं आहेत. या दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगला संवाद होत नसल्याचं देखील समोर आलं आहे.

गणित विषय शिकवणं आणि शिक्षण घेणं अवघड
जवळपास 50 टक्के विद्यार्थ्यांकडे पुस्तकं उपलब्ध नाहीत. एनसीईआरटीच्या वेबसाईट आणि दीक्षा पोर्टलवर ई बुक्स उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थ्यांमध्ये ई पाठ्यपुस्तकांविषयी जागरुकता नसल्याचं समोर आलं आहेत. यात अनेकांचं म्हणणं असं आहे की, ऑनलाईन माध्यमातून गणित विषय शिकवणं आणि शिक्षण घेणं अवघड आहे.  गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये अनेक सिद्धांत तसेच प्रयोग असतात. त्यामुळं हे विषय शिकवणं कठिण जात आहे.