पाटणा : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात, रिया चक्रवर्तीबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "जर कोणताही आरोपी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बिनबुडाची वक्तव्ये करत असेल तर ते चुकीचं आहे, आक्षेपार्ह आहे. लायकीचा अर्थ तिच्या वय तसंच सामाजिक उंचीबाबत होता आणि बिहारमध्ये अशाप्रकारचीच बोलीभाषा आहे," असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवल्यानंतर, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आनंद व्यक्त करताना बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, "बिहार पोलिसांनी जे काही केलं ते योग्य होतं आणि कायद्याच्या कक्षेत होतं. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका-टिप्पणी करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही असंही म्हटलं होतं.


रिया चक्रवर्तीने कोर्टात आरोप केला होता की, मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या राजकीय ताकदीचा वापर करुन सुशांत सिंह प्रकरणाला महत्त्व देत आहे. त्यावर गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी करण्याची रियाची लायकी नसल्याचं म्हटलं होतं.


मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची रियाची लायकी नाही : बिहारचे पोलीस महासंचालक


बिहार पोलीस महासंचालकांच्या या वक्तव्याचा काही जणांनी समर्थन केलं होतं तर काही जणांनी टीकाही केली होती. सोशल मीडियावर गुप्तेश्वर पांडे यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी स्पष्टीकरण दिलं. "या प्रकरणात माझं कोणासोबत वैयक्तिक वैर नाही. बिहार पोलीस कायद्यानुसार काम करत आहेत."


ते पुढे म्हणाले की, "जर एखाद्या राजकीय नेत्याने बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी केली तर मी यावर काहीही बोलणार नाही. पण जर एखाद्या आरोपीने बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर काहीही बिनबुडाची टिप्पणी केली तर हे आक्षेपार्ह आहे."


एएनआय या न्यूज एजन्सीसोबतच्या बातचीतदरम्यान गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, "सुशांत राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती एक आरोपी आहे, हे विसरुन चालणार नाही. रियाचं नावं बिहार पोलीस आणि सीबीआय या दोघांच्या एफआरआरमध्ये आहे."


दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. ही आत्महत्या असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं. यानंतर सुशांतचे वडील के के सिंह यांना पाटणा पोलिसात गुन्हा दाखल करुन, रिया चक्रवर्तीवर आत्महत्येसह इतर गंभीर आरोपही केले.