भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला. सध्या अनलॉक असला तरी शाळा महाविद्यालये बंदच आहेत, तर लॉकडाऊन काळात अनेक खासगी शाळांनी आपली आर्थिक उलाढाल बंद होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती सध्या सुरु केली आहे. मात्र राज्यातील दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या आणि आदिवासी दुर्गम भागातील मुले या ऑनलाईन शिक्षण प्रणालीपासून आजही वंचीत आहेत. ज्या भागात विजच नाही त्या भागात मोबईल आणि ऑनलाईन शिक्षण ही संकल्पनाच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना माहित नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणामुळे गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र आपले दैनंदिन काम आटपून समाजातील या दुर्लक्षित विद्यार्थ्यांना थेट आदिवासी कातकरी पाड्यावर जाऊन शिक्षण देण्याचे काम भिवंडीतील एक दांपत्य करीत आहे. पतीने किलीचे शिक्षण पूर्ण केलेले तर पत्नी महापालिकेत सफाई कामगार. मात्र आपापली कामे आटोपून दुपारी या आदिवासी विद्यार्थ्यांना शिकविण्याचा चंग या दांपत्याने बांधला आहे. कोरोना संकटात सफाई कर्मचारी कोविड योध्दा म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. तर हे कर्तव्य बजावून उरलेल्या वेळेचा सदुपयोग करून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम हे दाम्पत्य एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत अविरतपणे करत आहेत.


भिवंडी तालुक्यातील भरे गावात राहणारे रुपेश सोनवणे हे वकिलीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. तर त्यांची पत्नी रेश्मा सोनावणे या भिवंडी महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रेश्मा सोनावणे यांना सुरुवातीपासूनच शिकविण्याची आवड असल्याने त्यांनी आपले डी.एड चे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. मात्र कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी शिक्षक बनायच स्वप्न बाजूला ठेवत मनपात सफाई कामगार म्हणून काम सुरु केले आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात आदिवासी मुलांना शिक्षण देऊन त्यांनी आपला शिक्षकी पेशा देखील सुरु ठेवला आहे. सकाळी मनपाची सफाई कामगार म्हणून नोकरी तर दुपारपासून संध्याकाळपर्यंत आदीवासी मुलांचे शिक्षण अशा दुहेरी भूमिकेत हे सोनावणे दांपत्य एप्रिल पासून काम करत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडचणी असतात. त्यातच लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने त्यांना शिकवून मनाला समाधान मिळतं, अशी प्रतिक्रिया या दोन्ही दांपत्यांनी दिली आहे.


पाहा व्हिडीओ : पक्षाचं घरटं वाचवण्यासाठी वृक्षतोड स्थगित, पक्षाच्या घराचं 'बांधकाम' वाचवण्याचा निर्णय



शाळेच्या धड्यांबरोबरच विद्यार्थ्यांना कविता, शारीरिक शिक्षण, वैक्तिक स्वच्छता, मास्क वापरणे, कवायत असे प्रकार देखील या विद्यार्थ्यांना शिकविले जात आहेत. तर मुलांना शिक्षणाचा ताण कमी करण्यासाठी गाण्यांवर नाचायला देखील सांगितले जाते. त्यामुळे या शाळेत येण्याची विद्यार्थ्यांना गोडी निर्माण झाली. सुरुवातीला पंधरा ते वीस विद्यार्थी येथे शिकण्यासाठी यायचे मात्र या शाळेत नव्या शिक्षकांची शिकविण्याची पद्धत मुलांना आवडल्याने आजूबाजूचे विद्यार्थी देखील आता या शाळेत यायला लागले आहेत. सध्या या शाळेत 40 ते 50 विद्यार्थी रोज येत आहेत.


शाळा बंद झाल्याने सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरु केलं परंतु आदिवासी पाड्यावरील मुलांना ऑनलाईन शिक्षणाबद्दल काहीच ज्ञान नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडे मोबाईल ही नाही आणि अनेकांच्या घरात टीव्ही देखील नाही. शिवाय गावात रेंज देखील नाही त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घ्यायचा कसा असा प्रश्न मुलांना पडला आहे. विद्यार्थ्यांचा विविध विषयांचा अभ्यास रखडत असताना गावात सर आणि मॅडम आल्या. त्यांनी सर्वांना एकत्रित करत अंगणवाडी असून 1 ली ते 10 वी पर्यंतच्या मुलांचा रखडलेला अभ्यास पूर्ण केला आणि लॉकडाऊन काळात विद्यर्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले आहे.


सरकारने ऑनलाईन शिक्षणास सुरुवातही केली. मात्र या ऑनलाइन शिक्षणाची सुविधा सर्वसाधारण मुलांपर्यंत पोहोचते का? याकडं सरकारचं दुर्लक्ष झाल आहे. आदिवासी खेड्या पाड्यावरील नागरिकांना दोन वेळच्या जेवणासाठी देखील काबाडकष्ट करावे लागते. अशात ते आपल्या मुलांना मोबाईल कुठून देणार, घरात टीव्ही नाही, मुलांकडे हातात मोबाईल नाही, शिवाय गावात रेंजही नाही. तर ऑनलाइन शिक्षणाचं मुलांना ज्ञानही नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घ्यायचं कसा? असा प्रश्न याठिकाणी पडलाय. कोरोना काळात महापालिकेत सफाई काम करीत असलेलं एक दाम्पत्य या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे तसेच लवकरात लवकर शाळा सुरु व्हावी अशी विनंती देखील केली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कौतुकास्पद...! अमरावतीत पक्षाचं घरटं वाचवण्यासाठी झाड तोडण्याचा आदेश मागे