मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. लेखी हमी देऊनही अनावधानानं वानखेडेंबद्दल वक्तव्य केल्याबद्दल मलिकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे कोणतेही वक्तव्य करणार नाही अशी हमीही त्यांनी उच्च न्यायालयात दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिकांचा माफीनामा स्विकारलाय.


काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी दिली होती. पण सोमवारी (6 डिसेंबर) महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मलिकांनी समीर वानखेडे 'चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे' अशी टीका केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात मुंबई हायकोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही मलिकांना सुनावलं आहे. वानखेडेंबाबत कोणतंही विधान करणार नाही, अशी हमी देऊनही टीका केल्याने मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. याप्रकरणी नवाब मलिकांनी हा माफीनामा सादर केला आहे.


न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी माफी मागणे चुकीचं नाही: जयंत पाटील
नवाब मलिकांच्या या माफिनाम्यावर बोलताना राज्याचे पाठबंधारे मंत्री जयंत पाटील म्हणाले की, "आरोप करतांना भाषा सांभाळूनच वापरायची असते, नाहीतर कटूता निर्माण होते. भगिनींच्या बाबत विशेष काळजी घ्यावी लागते. सर्व राजकारण्यांनी बोलताना तारतम्य ठेवायला हवे. नवाब मलिक जे बोलत होते ते फॅक्टसवर बोलत होते. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर जर माफी मागितली असेल तर त्यात काही चुकीचे नाही. कोर्ट आपले माय-बाप आहे आणि अनावधानाने अवमान झाला असेल तर माय-बापची माफी मागण्यात हरकत काय? चूक झाली की माफी मागणे हे मोठेपण आहे."


संबंधित बातम्या :