Omicron Variant in Gujarat : गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण गुजरातमध्ये आढळलेल्या पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाच्या संपर्कात आले होते. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी गांधीनगरमध्ये पाठवण्यात आले होते, याचा रिपोर्ट आज आलाय. यामध्ये दोन्ही रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गुजरातमधील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या तीन झाली आहे.  


गुजरातमधील 72 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली होती. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची पत्नी आणि भावालाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली. जामनगरचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी म्हणाले की, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सध्या कोणतही लक्षणं दिसत नाही. सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.  गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आढळलेला 72 वर्षीय व्यक्ती झिम्बाब्वेमधून परतला होता. त्याच्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे विषाणू आढळले. त्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांचीही चाचणी घेण्यात आली. त्यामधील दोन जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलेय. रुग्ण आढळलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत कऱण्यात आलाय. 


देशात 26 रुग्ण -
राज्यस्थानमध्ये 9, महाराष्ट्रात 11, गुजरातमध्ये तीन, दिल्लीत एक तर कर्नाटकमध्ये दोन ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत 26 ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे.  


महाराष्ट्रातील सहा रुग्णांची ओमायक्रॉनवर मात -
महाराष्ट्रातील सहा रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. यामध्ये चार जण पिंपरी चिंचवडमधील आहेत. तर एक पुणे आणि एक डोंबिवलीमधील रुग्णाचा समावेश आहे.  


धारावीमध्ये पहिला रुग्ण - 
राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicron) हळूहळू हात पसरतोय. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात असली तरी ओमायक्रॉन संकट देशात येऊन ठेपलं आहे. आता धारावीत देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.  पूर्व  आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.


...तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार  
दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे. ओमायक्रॉनमुळे लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद द्यायला लागलेत. पण जुन्नर,  दौंड,  पुरंदर आणि बारामती या चार तालुक्यात डोसचे प्रमाण कमी आहे.  ते वाढवण्यास प्रशासनास सांगितलं आहे.  येत्या आठवड्यात आम्ही या चार तालुक्यात दुसर्‍या डोससाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु पुढच्या आठवड्यात या चार तालुक्यातील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.