चंदीगड : पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात माथा टेकवला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिह सिद्धू यांच्यातील वाद कायम असून मुख्यमंत्र्यांनी सिद्धू यांना सार्वजनिकरित्या आपली माफी मागण्याचा आदेश दिला आहे. तर  सिद्धू यांनी अशी माफी मागण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत असून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचं चित्र आहे. पण त्या आधीच पंजाब काँग्रेसमध्ये कलह सुरु झाला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योतसिंह सिद्धू असा वाद रंगला असून पक्षाच्या हायकमांडने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 


 






पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह मिटावा म्हणून हाय कमांडने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा विरोध असतानाही नवज्योतसिंह सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवलं. अध्यक्ष बनतात नवज्योतसिंह सिद्धू यांनी काँग्रेसच्या बहुतांशी आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली. तसेच आपल्या समर्थकांच्याही भेटी-गाठी सुरु केल्या. 


याचाच भाग म्हणून सिद्धू यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची भेट घेतली. कोरोना काळात गर्दी जमा करण्यास मनाई असतानाही सिद्धू यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं आहे. 


माफी मागण्यास नकार
गेल्या काही दिवसात सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आपली प्रतिमा खराब होत असून सिद्धू यांनी जाहिरपणे आपली माफी मागावी असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांची इच्छा आहे. तर आपण माफी मागणार नसल्याचं सिद्धू यांनी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 


पंजाब काँग्रेसमधील वाद मिटावा म्हणून सिद्धू यांना जरी प्रदेशाध्यक्ष केलं असलं तरी जोपर्यंत सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह एकत्र येत नाहीत तोपर्यंत पंजाब काँग्रेसला धोका कायम आहे. 


महत्वाच्या बातम्या :