नवी दिल्ली : कोरोनाच्या (India Corona Update)दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नाही, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. यानंतर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (shiv sena mp Sanjay Raut) यांनीही यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत दिल्लीत बोलताना म्हणाले की, ऑक्सिजन अभावी एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवारांनी केंद्राविरोधात खटला दाखल करावा, असं संजय राऊत म्हणाले.  ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचा  मृत्यू झाला आहे आणि ते सत्य आहे, असंही ते म्हणाले.


Pegasus Spyware : 'पेगॅसस'चा हल्ला आणीबाणीपेक्षा भयंकर, याचे खरे बाप आपल्याच देशात, शिवसेनेचा हल्लाबोल


राऊत म्हणाले की, ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन धावत होते, त्यांचा यावर विश्वास बसतो का? हे सांगायला हवं. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे, असंही ते म्हणाले.


Corona : देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही; केंद्र सरकारचे संसदेत अजब उत्तर


ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचं लेखी उत्तर


दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला का? या प्रश्नाच्या उत्तरावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिलं आहे की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही, असं लेखी उत्तरात सांगण्यात आलं आहे.