बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर हायकमांडकडून प्रचंड दबाव येत आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत कर्नाटकमध्ये नवीन मुख्यमंत्री पदभार स्वीकारणार असा दावा केला जात असताना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 'डिनर डिप्लामसी'च्या माध्यमातून आपले राजकीय डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. कर्नाटकातील भाजपच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 25 जुलैला येडियुरप्पा यांनी एका पार्टीचे आयोजन केलं असून त्यामध्ये भाजपच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे.
नुकतंच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा असं पक्षाच्या हायकमांडने आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे. पण येडियुरप्पा यांनी या गोष्टीचं खंडन केलं असून आपण राज्यातील विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
मुख्यमंत्री बदलणार, भाजप प्रदेशाध्यक्षांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांची 47 सेकंदाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत कर्नाटकमध्ये नवीन मुख्यमंत्री आणि नवी टीम कार्यरत होणार आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बदलण्याचा निर्णय हायकमांडने घेतला आहे.
मुख्यमंत्री बदलाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षानी आपला याच्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. या संबंधी निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एकीकडे येडियुरप्पा यांच्यावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असा दबाव वाढत असताना दुसरीकडे येडियुरप्पा यांनी आपली राजकीय चाल सुरु केली आहे. आता येडियुरप्पा यांची ही डिनर डिप्लोमसी त्यांची खुर्ची वाचवणार का नाही हे येत्या आठवड्याभरात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या :