मुंबई : कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ असो वा कोणताही आर्थिक व्यवहार असो, आता सर्वत्र आधार कार्ड असणं बंधनकारक झालं आहे. अनेक ठिकाणी डझनभर कागदपत्रे दाखवण्यापेक्षा केवळ आधार कार्ड दाखवल्यास काम होतं. पण हे आधार कार्ड हरवलं तर मात्र अनेकांना त्रासदायक ठरु शकतं.आता हा त्रास संपणार असून आधार कार्ड हरवल्यास काळजी करण्याचं कोणतंही कारण उरलं नाही. आपले आधार कार्ड हरवल्यास दुसरे आधार कार्ड जवळच्या एनरोलमेंट सेंटरवरुन (Aadhaar Enrolment Centre) प्राप्त करता येते. युआयडीएआयने ही माहिती दिली आहे.
आपले आधार कार्ड हरवल्यास जवळच्या एनरोलमेंट सेंटरवर जाऊन आपल्याकडील काही आवश्यक डॉक्युमेन्ट्स जसे ओळखपत्र वगैरे दाखवावं लागेल आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन करावं लागेल. त्यामुळे लगेच आपल्याला आपल्या आधार कार्डची कॉपी हातात मिळेल. या प्रक्रियेसाठी आपल्याला काही ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे.
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची एनरोलमेंट आयडी माहित नाही किंवा आपली डेमोग्राफिक डिटेल्स लक्षात नाही किंवा आपले आधार मोबाईल किंवा ई मेलशी कनेक्ट नाही तर जवळच्या आधार सेवा केंद्राची मदत घ्यावी लागेल.
आधार कार्डमध्ये नाव, पत्ता बदलायचा असेल तरी किती खर्च आहे?
जर आपल्याला आधार कार्डवरील नाव,पत्ता, जन्म तारीख, ई मेल किंवा इतर काही माहितीत बदल करायचा असेल तर आपल्याला 50 रुपये खर्च येऊ शकतो. जर आपल्याला बायोमेट्रिक अपडेट करायचं असेल तर 100 रुपये खर्च येऊ शकतो. या पेक्षा अतिरिक्त रक्कम मागितली तर आपण 1947 या नंबरवर कॉल करु शकता किंवा help@uidai.gov.in या पत्त्यावर तक्रार नोंद करु शकता. नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. ही सेवा निशुल्क आहे.
महत्वाच्या बातम्या :