पुणे : जीएसटी'तील तरतुदींविरोधात कर सल्लागारांनी येत्या 29 जानेवारीला देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 जानेवारीला म्हणजे शुक्रवारी देशभरातील 'जीएसटी'च्या मध्यवर्ती कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल आणि संबोधीत घटक सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकराने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणाली या विरोधात हे आंदोलन असल्याचं कर सल्लागारांच्या' संघटनेनं आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितल आहे. पुण्यात हे आंदोलन वाडिया कॉलेज जवळील जीएसटी (जुने एक्साईज ऑफिस) कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता होणार आहे.
भारतातील कर सल्लागार, सर्व छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांना कर कायद्यांची पूर्तता करायची असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी, या तणावात ते असतात. छोट्या मध्यम व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री, वसूली, बँक लोन, हिशोब, कर कायदे पूर्तता ही सर्व कामे स्वत: करावी लागतात. गेल्या तीन ते पाच वर्षात कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. कर खात्यास कर चुकविणाऱ्यांना जेरबंद करता येत नाही. म्हणून दर वर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. याच अयोग्य कर कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी निषेध नोंदविण्याचे आम्ही ठरवले आहे. या निषेध अभियानाला भारतभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक व्यापारी संघटनाही यामध्ये सहभागी होत आहेत असा दावा कर सल्लागारांच्या प्रतिनिधींनी या पत्रकार परिषदेत केला आहे,
आंदोलनाच्या दिवशी सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल काळे कपडे परिधान करून, काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
संबंधित बातम्या :
जीएसटीचे डिसेंबरमध्ये विक्रमी 1.15 लाख कोटींचं संकलन
कोरोना काळात जीएसटी संकलन पहिल्यांदा 1 लाख कोटींच्या पार, महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक